नगरसेवक अभय तातेड यांची जिल्हाधिकाèयांकडे चौकशीची मागणी
तभा वृत्तसेवा
बाभूळगाव,
babulgaon municipal councils नगर पंचायतमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजात गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा, आर्थिक अनियमितता व नियोजनशून्य कारभार झाल्याचा आरोप करत नगरसेवक अभय सिद्धकरण तातेड यांनी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे नगर पंचायतेच्या आर्थिक व्यवहारांबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. तक्रारीनुसार, घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटाची मुदत संपणार असल्याची माहिती प्रशासनाला आधीपासून असतानाही नवीन निविदा प्रक्रिया वेळेत राबविण्यात आली नाही. निविदा तयार करणे, अंदाजपत्रक मंजूर करणे, तांत्रिक मान्यता मिळविणे व निधीची तरतूद करणे ही संबंधित अधिकाèयांची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या निष्काळजीपणामुळे विद्यमान कंत्राटदारास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून उपलब्ध असलेल्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर न करता नागरिकांच्या करातून जमा झालेल्या सर्वसाधारण निधीतून दरमहा सुमारे 5 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. नगरसेवक अभय तातेड यांनी, सर्वसाधारण निधी हा शहरातील मूलभूत सुविधा, विकासकामे व नागरिकांच्या हिताच्या योजनांसाठी वापरण्याचा निधी आहे. प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी आणि निष्काळजीपणाची किंमत नागरिकांच्या पैशातून चुकवली जात असल्यास ते अत्यंत गंभीर बाब असून याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हठले आहे.
तक्रारीत, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यासाठी आवश्यक मंजुरी किंवा मुदतवाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे का पाठविण्यात आला नाही, हा देखील चौकशीचा विषय आहे. यामध्ये आर्थिक नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे तातेड यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या संपूर्ण प्रकरणाचे स्वतंत्र लेखापरीक्षण, कंत्राटदारास देण्यात आलेल्या मुदतवाढीची कारणे व मंजुरी सार्वजनिक करणे, तसेच दोषी अधिकारी व संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात योग्य व वेळेत कार्यवाही न झाल्यास नगर पंचायत कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण व जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे या तक्रारीकडे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे बाभूळगावकरांचे लक्ष लागले आहे.