गुरूपौर्णिमा ज्ञान, प्रकाश, आत्मशुद्धी आणि साधनेचे प्रतीक: पं. अग्निहोत्री

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
वर्धा,
guru purnima गुरू म्हणजे अज्ञान दूर करून ज्ञान देणारा मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाचे प्रतीक असलेला दिवस. वेदव्यासांच्या जन्मतिथीमुळे याला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात, असे मार्गदर्शन पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले. शिवशंकर सभागृहात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू पौर्णिमा व गुरू शिष्य परंपरा याविषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.
 
guru purnima
 
ते पुढे म्हणाले, शास्त्रवचनानुसार, ध्यान, पूजा, मंत्र आणि मोक्ष यांचे मूल गुरूच आहेत. गुरूची मूर्ती ही ध्यानाचे मूळ, गुरूपद हे पूजेचे मूळ, गुरुवचन हे मंत्राचे मूळ आणि गुरुकृपा ही मुक्तीचे मूळ मानली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुला ब्रह्मा, विष्णू, महेश या स्वरूपातील सर्जन, पालन आणि संहार करणार्या शक्तींचे मूर्त रूप समजले जाते. तो केवळ विद्या देत नाही तर मूल्य, संस्कार आणि जीवनकला घडवतो. परमहंस आणि विवेकानंदांची परंपरा पाहता, केवळ पूजा नव्हे तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे सत्यवाद, निःस्वार्थ सेवा, धर्मनिष्ठ जीवन आणि साधना यांचा नवा संकल्प करणे हेच खरे गुरू पौर्णिमा महात्म्य आहे.
 
 
वेदव्यासांनी चार वेदांचे विभाग करून ते लोकांपर्यंत पोहोचण्याजोगे केले म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात असे ते म्हणाले. त्यांनी महाभारत, ब्रह्मसूत्र, अठरा पुराणे आणि श्रीमद्भागवत यांसारख्या महाग्रंथांची रचना करून सनातन धर्माचे तत्त्वज्ञान सुव्यवस्थित केले. महाभारताला तर पंचम वेद असेही संबोधले जाते. महाभारतातील भीष्मपितामह हे दृढ व्रतानिष्ठ, धर्मनिष्ठ आणि आजीवन ब्रह्मचारी असे आदर्श पुरुष मानले जातात; त्यांची प्रतिमा ‘गुरु-शिष्य संबंधातील निष्ठा व त्याग’ याचे जीवंत उदाहरण मानली जाते. श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतेचा उपदेश देऊन धर्म, कर्म, ज्ञान, भक्ती, योग यांचे सार दिले; ही गीता म्हणजे गुरू-उपदेशाचे कालातीत रूप आहे, त्यामुळे श्रीकृष्णाला जगतगुरू म्हटले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
संचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोठारे यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. रितेश सुळे, डॉ. दीपक पुनसे, डॉ. गजानन जंगमवार, डॉ. प्रसाद जुमळे, डॉ. दिनेश वंजारी, डॉ. अनिल महल्ले, डॉ. प्रिया मिश्रा, प्रा. स्वरा अष्टपुत्रे, प्रा. संगीता कोठारे, प्रा. गौरी जाधव, प्रा. निळकंठ ढोबाळे, अभिजीत रघुवंशी, गजानन पोकळे, गणेश काळे आदींसह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.