UKSSSC घोटाळा; ईडीच्या रडारवर हकम सिंग!

६३ लाखांची मालमत्ता जप्त

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
देहराडून,
Hakam Singh on ED's radar उत्तराखंडमधील बहुचर्चित UKSSSC भरती परीक्षा पेपर लीक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई करत मुख्य आरोपी हकम सिंग रावत याची सुमारे ६३ लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. भरती घोटाळ्यातून मिळालेल्या अवैध उत्पन्नाचा वापर मालमत्ता खरेदीसाठी करण्यात आल्याचा दावा ईडीने केला असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचा तपास अद्याप सुरू असल्याचे सांगितले आहे.ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत ही कारवाई केली आहे. तपासात हकम सिंग रावत आणि त्याच्या साथीदारांनी भरती परीक्षांमध्ये गैरप्रकार करून उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अवैध कमाईतून खरेदी करण्यात आलेल्या सुमारे ६३ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.
 
 
 
hakam
आर्थिक तपासादरम्यान हकम सिंग रावतच्या बँक खात्यांसह उत्पन्नाच्या स्रोतांबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. भरती घोटाळ्यातून सुमारे ९५ लाख रुपयांची अवैध रक्कम मिळाल्याचे तपासात समोर आले असून, बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा झाल्याचेही निदर्शनास आले आहे. ही रक्कम कायदेशीर असल्याचे दाखवण्यासाठी आयकर विवरणपत्रात कृषी उत्पन्न दाखवण्यात आले होते. मात्र, तपासादरम्यान कृषी उत्पन्नाचे दावे सिद्ध झाले नसल्याचा आरोप ईडीने केला आहे.या प्रकरणाच्या तपासात ईडीने १४ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत डिजिटल उपकरणे, बँक व्यवहारांची कागदपत्रे, मालमत्तेची नोंदपत्रे आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे भरती घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
 
ईडीच्या माहितीनुसार, तपासाची व्याप्ती २०१६ आणि २०२१ मध्ये झालेल्या UKSSSC भरती परीक्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटवणे, ओएमआर शीटमध्ये फेरफार करणे आणि उमेदवारांना अवैध लाभ मिळवून देण्यासाठी संघटित नेटवर्क कार्यरत असल्याचे पुरावे समोर आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. या प्रकरणात हकम सिंग रावत, RMS Techno Solutions Pvt. Ltd. चे काही कर्मचारी, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित व्यक्ती आणि कथित मध्यस्थांनी मिळून पेपरफुटीचे जाळे उभे केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणात देहराडून येथील विशेष पीएमएलए न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली असून, RMS Techno Solutions Pvt. Ltd. चे काही कर्मचारी, सरकारी अधिकारी, मध्यस्थ आणि इतर आरोपींची नावे त्यात नमूद करण्यात आली आहेत. नवीन पुरावे समोर आल्यास पुढील कारवाई केली जाईल, असे ईडीने स्पष्ट केले आहे. उत्तराखंडमध्ये घडलेल्या पेपरफुटीच्या घटनांनंतर भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारने अनेक कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत. फसवणूकविरोधी कायदे अधिक कडक करण्यात आले असून, विशेष कृती दल (एसटीएफ), दक्षता विभाग आणि ईडीकडून आर्थिक गुन्ह्यांचाही समांतर तपास सुरू आहे. भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.