तिरुमला,
hardiks new avatar goes viral भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या रविवारी (२ ऑगस्ट) सकाळी त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मासोबत आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. आयपीएल २०२६ हंगामानंतर दुखापतीमुळे मैदानापासून दूर असलेल्या हार्दिकने या वेळी पारंपरिक पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. विशेष म्हणजे, त्याने डोक्याचे मुंडन केले होते आणि कपाळावर टिळा लावलेला दिसला. हार्दिक आणि माहिका यांनी मंदिरातील प्रसिद्ध सुप्रभातम सेवेत सहभागी होत श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. त्यांच्या दर्शनाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत असून त्याच्या पुनरागमनाची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. भारताच्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीत हार्दिकची महत्त्वाची भूमिका मानली जात आहे. मात्र, दुखापतीमुळे त्याला मागील काही मालिका गमवाव्या लागल्या आहेत. फिटनेस चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर तो सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय संघाकडून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हार्दिक पांड्याने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर त्याचा अखेरचा एकदिवसीय सामना २०२५ च्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत झाला होता. त्यामुळे आता त्याच्या पुनरागमनाकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.