मुंबई
hrithik roshan सोशल मीडियावर दररोज नवे ट्रेंड चर्चेत येत असतात. सध्या अभिनेता ऋतिक रोशनशी संबंधित #WeNeedToApologizeToHrithikRoshan हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असून, या ट्रेंडमुळे बॉलिवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या कंगना रनौत आणि ऋतिक रोशन यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
या ट्रेंडवर खुद्द ऋतिक रोशनने प्रतिक्रिया दिल्यानंतर वादाला पुन्हा हवा मिळाली. ऋतिकच्या वक्तव्यानंतर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत त्याच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ऋतिकच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करत आपली भूमिका मांडली.
ऋतिक रोशनची कथित गर्लफ्रेंड सबा आझादचा उल्लेख करत कंगनाने लिहिले, “ऋतिक, तुला सबाच्या रूपात एक योग्य जोडीदार मिळाला आहे याचा मला आनंद आहे. तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता. पण आता जेव्हा तू एका कमिटेड नात्यात आहेस, तेव्हा दुसऱ्या स्त्रीला अशा प्रकारे त्रास देणे किंवा अस्वस्थ करणे तुला शोभत नाही. तुझ्या नावाने जे लोक मला ट्रोल करत आहेत, त्यांना थांबवण्याऐवजी तू या वादात आगीत तेल ओतत आहेस. स्वतःच्या जोडीदारालाही अशा परिस्थितीत अडकवू नकोस.”या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी सोशल मीडियावर झालेल्या एका शाब्दिक चकमकीत आहे. कंगना आणि ‘सीजेपी’चे प्रवक्ते सौरव दास यांच्यातील वादादरम्यान सौरव यांनी स्वतःचा उल्लेख ‘यंग ऋतिक रोशन’ असा केला होता. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांना २०१६ मधील कंगना-ऋतिक वादाची आठवण झाली.
या ट्रेंडवर आलेल्या एका पोस्टला उत्तर देताना ऋतिक रोशनने लिहिले होते, “दुसरा माणूस आवडत नाही म्हणून एकाची बाजू घेणे हा समाजाचा मोठा दोष आहे. भविष्यात जेव्हा सत्याच्या आधारे चर्चा होईल, त्या क्षणाची मी वाट पाहीन.” ऋतिकच्या याच प्रतिक्रियेनंतर कंगनाने पुन्हा एकदा सोशल मीडियावरून आपली नाराजी व्यक्त केली.दरम्यान, २०१६ मध्ये एका मुलाखतीत कंगना रनौतने ऋतिक रोशनचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यानंतर दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कायदेशीर नोटिसा, ई-मेल्स आणि आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला होता. जवळपास दशकभरानंतरही या दोघांमधील वादाची चर्चा अधूनमधून समोर येत असल्याचे या नव्या सोशल मीडिया ट्रेंडमुळे पुन्हा स्पष्ट झाले आहे.