`स्वातंत्र्य दिन तोंडावर; अद्याप जिपच्या विध्यार्थ्यांना दुसरा गणवेश नाही
शाळा सुरू होऊन एक महिना उलटला
दिनांक :02-Aug-2026
Total Views |
वर्धा,
zp students uniform जिल्ह्यात नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिना उलटला आहे. १२ दिवसांनी स्वातंत्र्य दिन येऊन ठेपला आहे. मात्र, जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या दुसर्या गणवेशासाठी अद्याप निधी प्राप्त झाला नाही. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना २ गणवेश देण्याचा दावा करणात येत होता, हे उल्लेखनिय! पहिल्या गणवेशाच्या शिल्लक निधीसह दुसऱ्या गणवेशाचा पूर्ण निधी मिळून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला १ कोटी ४८ लाख ८२ हजार ४०० रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. नवीन ऑनलाइन प्रणालीद्वारे शिक्षण विभागाने वरिष्ठ स्तरावर निधीची मागणी पाठविली आहे. जिल्ह्यातील ९५० शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या ४१ हजार ३४०
विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जात आहे. यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात प्रति गणवेश २४० रुपये या प्रमाणे ९९ लाख २१ हजार ६०० रुपये निधी मंजूर करून तालुकास्तरावर वितरित केला आहे. या निधीतही पालकांना स्वतःच्या खिशातून काही रक्कम खर्च करून पहिला गणवेश शिवून घ्यावा लागला. प्रत्येक विद्यार्थ्यांला दरवर्षी दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. यामध्ये एक नियमित शालेय गणवेश, तर दुसरा स्काऊट-गाइड गणवेश असतो. शासनाकडून प्रति गणवेश ३०० रुपये म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांमागे ६०० रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र, पहिल्या गणवेशासाठी प्रति विद्यार्थी ६० रुपये शिल्लक रक्कम तर दुसर्या गणवेशासाठी ३०० रुपये अद्याप वितरित करण्यात आलेले नाहीत. शाळा सुरू होऊन महिना लोटला तरी शिक्षण विभागाला हा शिल्लक निधी मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश नेमका कधी मिळणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.