किरण राजदेरकर
janakrosh movement काही चुकीचे होत असल्याचे वाटल्यास त्याबद्दलचा आक्रोश जरूर व्यक्त व्हावा, पण तो लोकशाही मार्गान, संविधानाच्या चौकटीतून. या पृष्ठभूमीवर आक्रोश कसा व्यक्त व्हावा, याचा आदर्श घालून देणारी एक चळवळ सुरू असून, ती हळूहळू देशभरात पसरते आहे. सेकंड इनिंग म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेऊन लहान स्वरूपात का होईना जनआक्रोश ही संस्था सुरू केली एका अधिकाऱ्याने २००४ मध्ये, रवींद्र कासखेडीकर, नॅशनल इन्शुरन्स कंपनीत मंडळ प्रबंधक होते. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक किंबहुना कुटुंबच संघ विचाराचे असल्याने सामाजिक भान, समाजसेवेचे बाळकडू संघातच मिळाले. नोकरीत असतानाही विविध मार्गानी समाजसेवा सुरूच होती. २००३मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना आली तेव्हा ती स्वीकारून सामाजिक कामासाठी ते मोकळे झाले. त्याच काळात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. जनता त्रस्त होती. पालिका प्रशासनाच्या अव्यवस्थेविरुद्ध काही सहका-यांना सोबत घेऊन त्यांनी जनआक्रोश उभा केला.
आंदोलनेही झाली. मात्र, संवैधानिक मागनिच. रवींद्र कासखेडीकर महणाले, एका परिचिताने रस्ते अपघातांचे व त्यात जखमी व मृतांचे प्रमाण वाढत असून काहीतरी करावे लागेल, असे निदर्शनास आणून दिले. त्यातूनच खऱ्या अर्थाने जन्म झाला 'जनआक्रोश फॉर बेटर ट्मारी' या चळवळीचा. आणखी काही सहकारी जुळले. 'जीवन है अनमोल, ना मिलता दोबारा रोके सडक दुर्घटना, यही संकल्प हमारा' या घोषवाक्यासह काम सुरू झाले. ध्येय रस्ता सुरक्षा. २०१२ मध्ये जनआक्रोशची रीतसर नोंदणी झाली. अगदी बोटावर मोजण्याइतक्या निवृत्तांना सोबत घेऊन वाहतूक सिग्नलजवळ उभे राहायचे. हेल्मेट घाला, सीट बेल्ट वापरा, वाहनाचा वेग मर्यादित ठेवा, मद्य प्राशन करून वाहने चालवू नका, वाहन चालविताना मोबाईल वापरू नका हे संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन उभे राहायचे. वाहतूक नियमांचे पालन करण्याची सूचना सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांना करायची. येणारे-जाणारे आश्चर्याने पाहायचे. हे सातत्याने सुरू ठेवले. अनेक निवृत्त जुळत गेले, कारवा बढ़ता गया. हे काम आजही सुरू आहे. शाळा-महाविद्यालये, कार्यालये, उद्यानांत जाऊन रस्ता सुरक्षा जागृती सुरू केली व आजही सुरूच आहे. पोलिसांसह विविध शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही हे काम पसंत पडले. केंद्रीय मंत्री व नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनाही हे काम आवडले. त्यांनी धरमपेठेतील ट्रैफिक पार्कमध्ये वाहतूक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी निधी दिला. तेथे प्रत्यक्ष वाहतूक नियमांचे प्रशिक्षण दिले जाते. 'सुरक्षित ट्रैफिक मिशन हम सबका' अशी जागृती देशभर होऊ लागली आहे. नागपुरातून सुरू झालेली जनआक्रोश चळवळ अमरावती, पुणे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, उत्तराखंड, ओडिशा राज्यापर्यंत पोहोचली आहे. विशेष सरकारी वकील पद्मश्री खा. अॅड. उज्ज्वल निकम यांनाही हे काम आवडले. ते आता जनआक्रोशचे अँड अॅम्बेसेडर झाले असल्याचे रवींद्र कासखेडीकर यांनी सांगितले. अपघाताच्या कारणांचा सखोल अभ्यास करून ते टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन, वाहतूक शिस्त गरजेची आहेच. ती लावण्यासाठी जनआक्रोशचा प्रयत्न सुरू आहे.