मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली

५० हजार क्युसेकने पाण्याची आवक

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नाशिक
jayakwadi dam water नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी अर्थात नाथसागर धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणाने आता ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर मजल मारली असून, शनिवार (दि. १ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ७९.७४ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात ५० हजार १० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.
 

jayakwadi dam water 
आवकेचा हा वेग कायम राहिल्यास येत्या आठवडाभरात नाथसागर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात असून, या जलसाठ्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील सिंचन, औद्योगिक वापर तसेच लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. मागील काही वर्षांतील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली पाणीटंचाईची अनिश्चितता यंदा निसर्गाने भरून काढल्याचे चित्र आहे.
सध्या नाथसागर धरणाच्या सांडव्यावरून कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. मात्र, जलसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन विसर्गाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, धरणातून माजलगाव jayakwadi dam water  धरणासाठी उजव्या कालव्यातून १ हजार १०० क्युसेक, तर डाव्या कालव्यातून सिंचनासाठी ७०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. दोन्ही कालव्यांमधून सध्या एकूण १ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे."नाथसागर धरणातून सांडव्याद्वारे अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. धरणातील पाणीसाठा ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतर तसेच वरच्या धरणांतून येणारी आवक आणि विसर्गाचा आढावा घेऊन परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. सध्या पाणी सोडण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा आदेश नाही," अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी दिली.दरम्यान, मागील वर्षी ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा झाल्यानंतर नाथसागर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. ३१ जुलै २०२५ रोजी धरणातील जलसाठा ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर सांडव्यावरून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. यंदा मात्र १ ऑगस्ट २०२६ रोजी धरणातील जलसाठा ७९.७४ टक्के असून, अद्याप सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.
नाथसागर धरणाची सद्यस्थिती पाहता धरणातील जलसाठा ७९.७४ टक्के असून, पूर्ण जलपातळी १५२२.०० फूट (४६३.९०६ मीटर) आहे. सध्याची जलपातळी १५१८.०६ फूट (४६२.७०५ मीटर) इतकी आहे. धरणातील जिवंत पाणीसाठा १७३१.०५८ दलघमी (६१.१२ टीएमसी), तर एकूण पाणीसाठा २४६९.१६४ दलघमी (८७.१९ टीएमसी) इतका झाला आहे.