चंद्रपूर,
mla mungantiwar गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तात्काळ पंचनामे करून बाधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) तसेच मुख्य सचिव आणि महसूल आयुक्त (नागपूर) यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देत नुकसान भरपाई देण्यासंदर्भाची मागणी केली आहे. यासोबतच चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पाण्याखाली गेली असून, उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी घरे, गोठे, शेतबांध, रस्ते व इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वर्धा आणि इरई नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून शेतीसह गावांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत आणि शासनाच्या नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई अदा करावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी पत्रात केली आहे.
याशिवाय, ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्या भागांसाठी विशेष मदत जाहीर करून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच शासनाने या गंभीर परिस्थितीची संवेदनशीलतेने दखल घेऊन तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत, असे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, या संकटाच्या काळात एकही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट करीत भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन नुकसानग्रस्तांना मदत करावी, प्रशासनाला पंचनाम्यांसाठी सहकार्य करावे आणि पात्र लाभार्थ्यांचे नुकसान शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.