प्राथमिक फेरी ३, ४ व ५ ऑगस्ट रोजी
नागपूर,
singing competition केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने यंदा प्रथमच राज्यस्तरीय खासदार चषक आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेत एकूण १०६ शालेय चमूतील सुमारे १५०० विद्यार्थी देशभक्तीच्या स्वरांनी वातावरण भारावून टाकणार आहेत.
मागील चार वर्ष ही स्पर्धा नागपूर स्तरावर घेण्यात येत होती. यंदा प्रथमच स्पर्धेला राज्यस्तरीय रूप देण्यात आले आहे, हे विशेष. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ, बालकला अकादमी, नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होत आहे. नागपूर शहर व जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे, देवाची आळंदी, धामणगाव, अमरावती, वर्धा, वरुड, उमरेड, यवतमाळ, सावनेर, भिवापूर, चंद्रपूर, बुलढाणा आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे.
गट 'अ' - इयत्ता १ ते ५ साठी व गट 'ब' - इयत्ता ६ ते १० वी अशा दोन गटांत होणाऱ्या स्पर्धेची प्राथमिक फेरी ३, ४ व ५ ऑगस्ट अशी तीन दिवस चालेल. या फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी १६ ऑगस्ट रोजी सुरेश भट सभागृहात होणार असून त्याच दिवशी सायं. ५.३० वाजता बक्षीस वितरण सोहळा होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित केली जातील. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी चमूला प्रशस्ती पत्र देण्यात येणार असून अंतिम फेरीतील विजेत्या चमूतील प्रत्येक विद्यार्थ्याला रोख पारितोषिके तर विजेत्या संघाला प्रतिष्ठेचा "खासदार चषक" बहाल करण्यात येणार आहे.