मुंबई
nana patole काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय दुधाने धुताना दिसत आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, कार्यकर्त्यांनी आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केली आहे. "काँग्रेस नेते नाना पटोले आपल्या कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजन करून घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नाना पटोले यांनी सांगितले पाहिजे की, मी राजकारण सोडले आहे आणि संन्यास घेतला आहे. साधुसंतांचे पाद्यपूजन केले जाते, त्याचप्रमाणे नाना पटोले यांचे कार्यकर्ते पाद्यपूजन करत आहेत आणि दुधाचा अभिषेक घालत आहेत," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.नवनाथ बन पुढे म्हणाले की, "कोणताही कार्यकर्ता तो भाजपचा असो किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीने पाद्यपूजन करून घेणे अतिशय चुकीचे आहे. हे आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम समजण्याचे लक्षण आहे. नाना पटोले यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे. आपण आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम समजतो, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे."यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीचा उल्लेख करत नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतात, असा व्हिडिओ समोर आला होता. दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांच्यासारखे माणसे..." असे म्हणत त्यांनी या प्रकरणावरून काँग्रेसवर टीका केली.