तभा वृत्तसेवा
पारवा,
ranbhaji यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाèया घाटंजी तालुक्यातील पारवा व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. या पावसामुळे परिसरातील निसर्ग बहरला असून रानभाज्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भातील प्रसिद्ध व दुर्मिळ रानभाजी ‘कटूरले’ आता वेलींवर लागण्यास सुरुवात झाली आहे. येथील शेतातील बांधांवर या वेलींना लहान-लहान हिरवी फळे लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी व रानभाज्या संकलित करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला या आदिवासीबहुल भागात नैसर्गिकरीत्या उगवणारी ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
कोणत्याही रासायनिक खतांशिवाय, केवळ जंगलात व शेताच्या कडेला निसर्गाच्या कुशीत ही वेल वाढते. सध्या बाजारात रानभाज्यांची आवक कमी असल्याने व या भाजीचे औषधी महत्त्व जास्त असल्याने कटुरल्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे कटूरल्याचे संकलन करून विक्री करणाऱ्यां ना यातून चांगला आर्थिक रोजगार मिळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.
कटूरले भाजीचे आरोग्यासाठी महत्त्व
प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेल्या कटूरल्यामध्ये इतर भाज्यांच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात प्रथिने आढळतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या भाजीच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ही भाजी कोणत्याही मानवनिर्मित खतांशिवाय नैसर्गिक वातावरणात उगवत असल्याने आरोग्यासाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते. यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटाचे विकार दूर होतात, पचनशक्ती वाढते.ranbhaji बाजारात या दुर्मिळ भाजीला प्रति किलो 250 ते 400 रुपयांपर्यंतचा चांगला भाव मिळतो. यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांना यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.