नवी दिल्ली,
NEET-PG 2026: Exam center close to home नीट-पीजी २०२६ परीक्षेच्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. आता विद्यार्थ्यांना दूरच्या परीक्षा केंद्रांवर जाण्याची किंवा शेवटच्या क्षणी प्रवासाची तयारी करण्याची गरज भासणार नाही. उमेदवारांना त्यांच्या घराच्या जवळ परीक्षा केंद्र मिळावे, परीक्षा शहराची माहिती वेळेत मिळावी आणि परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नीट-पीजी २०२६ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हे बदल केले आहेत. परीक्षेतील ताण कमी करणे, सुरक्षितता वाढवणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनवणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नीट-पीजी २०२६ च्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS), तांत्रिक टीम आणि संबंधित यंत्रणांना परीक्षा कोणत्याही अडथळ्यांशिवाय, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले.यंदा नीट-पीजी २०२६ साठी एकूण २,७३,१८३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उमेदवारांच्या संख्येत १२.५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. परीक्षा केंद्र निवड प्रक्रियेत सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीने परीक्षा केंद्र दिले जात होते. त्यामुळे उशिरा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा जवळची केंद्रे उपलब्ध होत नसत आणि त्यांना दूरच्या राज्यांमध्ये जावे लागत असे.नवीन नियमानुसार, उमेदवारांना परीक्षा केंद्रासाठी तीन पसंतीची राज्ये निवडावी लागणार आहेत. यामध्ये उमेदवाराच्या स्वतःच्या राज्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. या बदलामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानाजवळ परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
तसेच, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांच्या परीक्षा शहराची माहिती सुमारे तीन आठवडे आधी देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास आणि निवासाची व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. यापूर्वी परीक्षा केंद्र आणि शहराची माहिती काही दिवस आधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.नीट-पीजी २०२६ च्या परीक्षा पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने (NBEMS) आता परीक्षेत १८० बहुपर्यायी प्रश्न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना २१० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.यापूर्वी परीक्षेत २०० प्रश्न असायचे आणि कमाल गुण ८०० होते. नवीन स्वरूपात परीक्षेचा एकूण कालावधी कायम ठेवण्यात आला असला तरी प्रत्येक प्रश्नासाठी उमेदवारांना तुलनेने अधिक वेळ मिळणार आहे.
परीक्षेसाठी ६०,००० हून अधिक कर्मचारी तैनात
नीट-पीजी २०२६ परीक्षा यावेळी एकाच सत्रात घेतली जाणार आहे. मागील काही वर्षांत काही कारणांमुळे परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. मात्र, आता एकाच सत्रात परीक्षा घेतल्याने सर्व उमेदवारांसाठी समान काठिण्य पातळीचे प्रश्नपत्रिका उपलब्ध होईल आणि मूल्यांकन प्रक्रिया अधिक निष्पक्ष होईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेपासून ते परीक्षा केंद्रापर्यंत आधार आधारित पडताळणी केली जाणार आहे. बोटांच्या ठशांची ओळख शक्य नसल्यास आयरिस बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे.प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय एन्क्रिप्शन तंत्रज्ञान, सुरक्षित ऑफलाइन तयारी आणि परीक्षेपूर्वी नियंत्रित डिजिटल डिक्रिप्शन प्रणाली लागू करण्यात आली आहे. तसेच फसवणूक, बनावट उमेदवार आणि गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी NBEMS कडून स्वतंत्र ई-मेल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. नीट-पीजी २०२६ परीक्षा देशातील सुमारे ३४० शहरांमध्ये आणि १,३०० हून अधिक परीक्षा केंद्रांवर एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ६०,००० हून अधिक कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.परीक्षा केंद्रांची पूर्वतपासणी, सीसीटीव्ही देखरेख, बायोमेट्रिक पडताळणी, उमेदवारांची तपासणी, सिग्नल जॅमर, सुरक्षित संगणक व्यवस्था आणि थेट निरीक्षण अशा विविध सुरक्षा उपाययोजनांच्या माध्यमातून नीट-पीजी २०२६ परीक्षा पार पाडली जाणार आहे.