नीट-यूजी २०२६ समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर

८ सप्टेंबरपासून नवे शैक्षणिक सत्र

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
NEET-UG 2026 counselling schedule नीट-यूजी २०२६ परीक्षेत यश मिळवून वैद्यकीय शिक्षणाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय समुपदेशन समितीने (MCC) महत्त्वाची घोषणा केली आहे. एमबीबीएस आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय कोट्याअंतर्गत समुपदेशनाची पहिली फेरी ४ ऑगस्टपासून सुरू होणार असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे नवीन सत्र ८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. एमसीसीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत वेळापत्रकात प्रवेश प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांची माहिती देण्यात आली आहे. एमसीसीच्या वेळापत्रकानुसार, अभिमत विद्यापीठे आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी ४ ऑगस्ट ते १७ ऑगस्टदरम्यान होईल. या फेरीत जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना २२ ऑगस्टपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागेल. त्यानंतर दुसरी फेरी २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर, तिसरी फेरी १० सप्टेंबर ते १८ सप्टेंबर आणि रिक्त जागांसाठीची अंतिम फेरी २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान पार पडेल. या प्रक्रियेनंतर प्रवेशाची अंतिम मुदत १० ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
 

NEET-UG 2026 counselling schedule 
 
राज्य कोट्यातील जागांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्टदरम्यान होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. दुसरी फेरी ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर, तिसरी फेरी १६ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर आणि रिक्त जागांसाठीची अंतिम फेरी ३ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित केली जाणार आहे.एमसीसीने यंदा समुपदेशन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विद्यार्थीहिताची करण्यासाठी काही महत्त्वाचे बदलही लागू केले आहेत. जागा मिळाल्यानंतर श्रेणीवाढीचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही. त्यांची जागा समुपदेशन प्रणालीमध्ये सुरक्षित राहणार आहे. तसेच उमेदवारांना एमसीसीच्या पोर्टलवरून ऑनलाइन राजीनामा देता येणार असून, त्यासाठी महाविद्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
 
 
याशिवाय, अभिमत विद्यापीठांमधील एनआरआय कोट्यातून प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक सत्र ८ सप्टेंबरपासून सुरू होणार असले तरी रिक्त जागा भरण्यासाठी पुढील समुपदेशनाच्या फेऱ्या नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील. प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शनिवार, रविवार आणि राजपत्रित सुट्ट्यांचे दिवसही कामकाजाचे दिवस म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे एमसीसीने स्पष्ट केले आहे.