अखेर गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा मृतदेह सापडला

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Nirmal Purja's body found पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान परिसरातील ब्रॉड पीकवर झालेल्या भीषण हिमस्खलनात मृत्यू झालेल्या जगप्रसिद्ध नेपाळी-ब्रिटिश गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा मृतदेह अखेर तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रविवारी (२ ऑगस्ट २०२६) बचाव पथकांना सापडला. जगातील १२वे सर्वात उंच आणि अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या शिखरावर झालेल्या दुर्घटनेने आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अल्पाइन क्लब ऑफ पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय निर्मल पुर्जा यांचा मृतदेह सुमारे ५,७०० मीटर उंचीवर आढळला. 'निम्स दाई' या नावाने प्रसिद्ध असलेल्या निर्मल पुर्जा यांच्यापर्यंत जमिनीवरील बचाव पथक पोहोचले असून, त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मृतदेहाचा शोध लावला. क्लबने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, ज्या पर्वतावर त्यांचे अपार प्रेम होते, त्याच पर्वताने त्यांना कायमचे आपल्यात सामावून घेतल्याची भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
 
 
Nirmal Purja
 
 
बचाव मोहिमेदरम्यान आणखी तीन मृतदेहही सापडले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी शनिवारी निर्मल पुर्जा यांच्या 'एलिट एक्सपेड' या मोहिमेचे आयोजन करणाऱ्या संस्थेने मोहिमेतील सर्व १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. सापडलेले मृतदेह जपानी छावणीत आणण्याचे काम सुरू असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.ब्रॉड पीक परिसरातील प्रतिकूल हवामान, उंच पर्वतीय भाग, हिमस्खलनाचा कायम असलेला धोका आणि तीव्र उतार यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण बनले आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरची मदतही घेता आलेली नाही. त्यामुळे जमिनीवरील पथकांकडूनच संपूर्ण शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
 
 
या मोहिमेचे नेतृत्व स्वतः निर्मल पुर्जा करत होते. त्यांच्या पथकात नेपाळचे पाच, पाकिस्तान, ओमान, अमेरिका आणि चीनमधील प्रत्येकी एक अशा एकूण दहा गिर्यारोहकांचा समावेश होता. यापूर्वी शुक्रवारी चार जणांचे मृतदेह सापडले होते. त्यापैकी ओमानच्या नादिरा अहमद अब्दुल्ला अल हार्थी, नेपाळचे पुर बहादूर गुरुंग आणि अमेरिकेचे मॅलरी गेस यांची ओळख पटली असून, त्यांचे मृतदेह विमानाने स्कार्दू येथे आणण्यात आले आहेत. ब्रॉड पीकवरील या दुर्घटनेने जागतिक गिर्यारोहण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनेक विक्रम आपल्या नावावर करणारे निर्मल पुर्जा हे जगातील आघाडीचे गिर्यारोहक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे गिर्यारोहण विश्वाने एका धाडसी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला गमावले आहे.