नवी दिल्ली,
NTA's surgical strike after NEET controversy नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने परीक्षा प्रक्रियेला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. परीक्षांशी संबंधित गोपनीय माहिती आणि संवेदनशील साहित्याचे संरक्षण करण्यासाठी एनटीएने ७.५ कोटी रुपयांच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेसाठी निविदा जारी केली आहे.या नव्या योजनेअंतर्गत दिल्लीतील मिंटो रोड येथील मुख्यालय, ओखला येथील प्रादेशिक कार्यालय, डेटाबेस सर्व्हर रूम, गोदामे तसेच प्रश्नपत्रिका आणि इतर गोपनीय साहित्य ठेवण्यात येणाऱ्या स्ट्राँग रूम्सवर चोवीस तास अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. सुरुवातीला हा करार दोन वर्षांसाठी असेल. समाधानकारक कामगिरी झाल्यास तो आणखी दोन वर्षांसाठी वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
निवड करण्यात येणाऱ्या सुरक्षा संस्थेकडून केवळ पारंपरिक सुरक्षा नव्हे, तर जीपीएस-आधारित गस्त, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली, रिअल-टाइम मॉनिटरिंग, अत्याधुनिक मेटल डिटेक्टर्स आणि प्रवेशद्वारांवरील कडक तपासणी यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.यावेळी एनटीएने कंत्राट देण्यासाठी पारंपरिक सर्वात कमी बोलीऐवजी 'क्वालिटी अँड कॉस्ट बेस्ड सिलेक्शन' (QCBS) पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे दर्जेदार सेवा आणि तांत्रिक क्षमता असलेल्या संस्थांना प्राधान्य दिले जाणार आहे.निविदेत सहभागी होणाऱ्या संस्थेकडे सुरक्षा क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव आणि मागील तीन वर्षांत किमान १० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणे आवश्यक आहे. तसेच मेट्रो, विमानतळ, केंद्रीय मंत्रालये किंवा मोठ्या विद्यापीठांमध्ये सुरक्षा सेवा पुरविलेल्या संस्थांना प्राधान्य दिले जाईल. इच्छुक कंपन्यांना १५ लाख रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. सीबीआयच्या तपासानंतर एनटीएच्या परीक्षा व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी संस्थेने व्यापक सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. सुमारे ६० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसह ७.५ कोटी रुपयांचा हा सुरक्षा आराखडा राबवण्यात येत असून, भविष्यातील परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पडतील, असा विश्वास एनटीएकडून व्यक्त करण्यात आला आहे.