जकार्ता,
Passenger ship catches fire in Indonesia इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ प्रवासी जहाजाला भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून अनेक जहाजे आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.इंडोनेशियाच्या राष्ट्रीय बचाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी जहाजावर एकूण २७१ प्रवासी आणि कर्मचारी होते. रविवारी दुपारपर्यंत २२५ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून उर्वरित बेपत्ता व्यक्तींचा शोध समुद्रात सुरू आहे. हे प्रवासी जहाज पूर्व जावा प्रांतातील सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीमधील मकासारकडे निघाले होते. जावा बेटाच्या ईशान्य किनाऱ्यालगत असलेल्या मदुरा बेटाजवळ पोहोचताच जहाजाला अचानक आग लागली. दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून आसपासच्या समुद्री परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची चौकशी सुरू असून सागरी सुरक्षा यंत्रणा आगीमागील कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, इंडोनेशियात गेल्या काही वर्षांत अशा सागरी दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. जुलै २०२५ मध्ये उत्तर सुलावेसी प्रांताजवळ एका प्रवासी जहाजाला आग लागून तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे १५० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. त्याच महिन्यात १९ जुलै रोजी मनाडोजवळ २८० प्रवाशांना घेऊन जाणारे 'केएम बार्सिलोना ५' हे जहाजही उलटले होते. यापूर्वी २०२१ मध्ये टर्नाटेहून निघाल्यानंतर 'केएम कार्या इंदाह' या जहाजाला मोलुक्का समुद्रात आग लागली होती. त्यावेळी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या माराव्या लागल्या होत्या. बचाव पथके आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने २२ मुलांसह १८१ प्रवासी आणि १४ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. १७ हजारांहून अधिक बेटांचा समावेश असलेल्या इंडोनेशियात जलवाहतूक हे प्रमुख वाहतूक साधन आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.