पेरू
tragic accident जगप्रसिद्ध नाझ्का लाइन्स पाहण्यासाठी युरोपीय पर्यटकांना घेऊन जाणारे छोटे विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे पेरूमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नाझ्का नगरपालिका प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानातील प्रवासी नाझ्का लाइन्सच्या हवाई सफरीसाठी निघाले होते. मात्र, गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला आणि प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नाझ्का लाइन्स हे जगातील प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळांपैकी एक आहे. शेकडो वर्षांपूर्वी वाळवंटात राहणाऱ्या स्थानिकांनी जमिनीवर प्रचंड मोठ्या आकारातील विविध चित्रे कोरली होती. या चित्रांमध्ये अनेक प्राणी आणि आकृत्यांचा समावेश आहे. जमिनीवरून ही चित्रे सहज लक्षात येत नाहीत, मात्र विमानातून त्यांचे स्पष्ट दर्शन होते. त्यामुळे नाझ्का लाइन्सची हवाई सफर पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
नाझ्का प्रशासनाच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानाने इका शहरातून उड्डाण केले होते. हे विमान एरोडियाना या खासगी विमान कंपनीचे होते. कंपनीच्या माहितीनुसार, एरोडियाना गेल्या 14 वर्षांपासून विमान सेवा क्षेत्रात कार्यरत असून, या कंपनीच्या विमानातून हजारो प्रवासी नाझ्का लाइन्सची हवाई सहल करत आले आहेत.
दरम्यान, विमान अपघातानंतर पेरूच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून, दुर्घटनेच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेतला जात आहे.
या अपघाताबाबत विमान कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. स्थानिक प्रशासनाकडून मृत प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू आहे.