गूढ नातेसंबंधांची मानसशास्त्रीय उकल ‘ध्यानीमनी’

दिलीप भट यांच्या स्मृतीत मानिनी संस्थेद्वारे नाटकाचे सादरीकरण

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
पराग मगर  
 
नागपूर, 
Play presented by Manini organization आपण आयुष्यभर मानवी नाती सांभाळताना त्यात अनाहूतपणे गुरफटत जातो. त्यातच आयुष्यात एखादी अनपेक्षित घटना घडल्यास त्या घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. अशा वेळी सत्य, विश्वास आणि नातेसंबंध यांची खरी परीक्षा लागते. अशाच गूढ नातेसंबंधांची मानसशास्त्रीय उकल करणारे प्रशांत दळवी लिखित ‘ध्यानीमनी’ हे नाटक सायंटिफिक सभागृहात सादर झाले. सुंदर संगीत, वास्तववादी नेपथ्य व प्रकाशयोजना आणि कलाकारांच्या जिवंत अभिनयाने हे नाटक प्रेक्षकांपर्यंत गर्भितार्थ पोहोचविण्यात यशस्वी झाले.
 
 
 
Play presented by Smrutit Manini organization
 
कथेच्या केंद्रस्थानी सदा आणि शालन हे पती-पत्नी व त्यांचा मोहित हा मुलगा आहे. मोहितभोवती घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर त्यांच्या आयुष्यात प्रचंड मानसिक उलथापालथ होते. त्या घटनेनंतर वास्तव आणि मनातील कल्पना, अपराधीपणाची भावना, भीती आणि सत्य यांचा संघर्ष सुरू होतो. नाटक जसजसे पुढे सरकते तसतसे प्रेक्षकांपुढे अनेक प्रश्न उभे राहतात आणि शेवटी एका अनपेक्षित व भावनिक वळणावर सत्य समोर येते. मोहित हे पात्र नाटकात प्रत्यक्ष रंगमंचावर दिसत नाही; मात्र संपूर्ण कथानक त्याच्याभोवती फिरते, ही या नाटकाची खास वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात संवादाचे महत्त्व, परस्परांवरील विश्वास आणि संवेदनशीलतेची गरज अधोरेखित करणारा संदेश नाटकातून प्रभावीपणे देण्यात आला. नात्यांमध्ये वाढत चाललेला दुरावा आणि मानसिक अस्वस्थता यांसारख्या समकालीन प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या कलाकृतीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिलीप भट यांच्या स्मृतीत मानिनी बहुउद्देशीय संस्था, नागपूरद्वारे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.