श्रीलंकेत गौतमची 'गंभीर' परीक्षा!

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Pressure on Gambhir and Gill भारतीय क्रिकेट संघासाठी श्रीलंकेविरुद्धची आगामी दोन सामन्यांची कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा लागणार आहे. या मालिकेतील कामगिरीवर संघाच्या भविष्यातील वाटचालीबाबतही मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज दीप दासगुप्ता यांनी संघाच्या अलीकडील कामगिरीवर भाष्य करताना, निकालात सुधारणा झाली नाही तर सर्वाधिक दबाव प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर येईल, असे मत व्यक्त केले आहे. आयएएनएसशी बोलताना त्यांनी सांगितले की, संघातील बदलांच्या प्रक्रियेला मैदानावरील यशाची जोड मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, प्रशिक्षक, कर्णधार आणि संपूर्ण संघ या तिघांवरही समान जबाबदारी आहे.
 

Pressure on Gambhir and Gill 
 
 
दीप दासगुप्ता यांनी भारतीय कसोटी संघाच्या स्थित्यंतरावरही प्रश्न उपस्थित केले. केवळ युवा खेळाडूंना संधी देणे म्हणजे स्थित्यंतर नव्हे, तर त्याचे सकारात्मक परिणाम सातत्याने दिसणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या भारतीय कसोटी संघ नेमक्या कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, हे स्पष्टपणे दिसत नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली.त्यांच्या मते, कसोटी क्रिकेटमध्ये अंतिम मोजमाप हे निकालांवरच होत असते. घरच्या मैदानावरील मालिका गमावल्यानंतर परदेशातही संघाला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे आता प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC २०२५-२७) दृष्टीने भारताकडे केवळ नऊ कसोटी सामने शिल्लक असून, अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी किमान सात विजय आवश्यक असल्याचे दासगुप्ता यांनी सांगितले.
 
 
भारत श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटीनंतर न्यूझीलंडविरुद्धही दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. सध्या WTC २०२५-२७ च्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर असून, पुढील प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे.श्रीलंकेतील फिरकीला पोषक खेळपट्ट्या आणि तेथील हवामान भारतीय संघासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरले आहे. त्यामुळे ही मालिका सहज अजिबात नसेल, असा इशाराही दासगुप्ता यांनी दिला. त्यांच्या मते, श्रीलंका आणि त्यानंतरचा न्यूझीलंड दौरा भारतासाठी कठीण असणार असल्याने कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला हलक्यात घेण्याची चूक संघाला परवडणारी नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी १५ ते १९ ऑगस्टदरम्यान गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल. दुसरा सामना २३ ते २७ ऑगस्टदरम्यान कोलंबोतील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर होणार आहे. या मालिकेतील निकालावर गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाची दिशा, शुभमन गिलच्या नेतृत्वाचे मूल्यमापन आणि भारतीय कसोटी संघाच्या स्थित्यंतराचे भवितव्य अवलंबून असल्याचे मानले जात आहे.