पी.टी. उषा यांनी केले 'नारी शक्ती'चे कौतुक
राष्ट्रकुलमध्ये भारतीय महिलांची सुवर्णपदकांची लयलूट
दिनांक :02-Aug-2026
Total Views |
ग्लासगो
pt-usha commonwealth-games राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या एकूण १३ सुवर्णपदकांपैकी ८ पदके महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. या कामगिरीबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्षा पी.टी. उषा यांनी महिला खेळाडूंचे कौतुक केले. त्यांची ही कामगिरी म्हणजे अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमांचे फळ असून, यामुळे मुलींच्या नवीन पिढीला मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे, असे त्या म्हणाल्या.
pt-usha commonwealth-games भारताने जिंकलेल्या १३ सुवर्णपदकांपैकी ८ पदके महिलांनी जिंकल्याचे पाहून मला प्रचंड अभिमान वाटतो. ही यशोगाथा म्हणजे खेळाडू, त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि सहाय्यक पथके यांच्या अनेक वर्षांच्या समर्पणाचे फळ आहे. प्रत्येक पदक हे चिकाटी आणि त्यागाची कथा सांगते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, या विजेत्या खेळाडू भारतातील असंख्य तरुणींना असा विश्वास बाळगण्यास प्रेरित करत आहेत की, त्यादेखील भारताची जर्सी परिधान करू शकतात आणि जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात. हीच 'नारी शक्ती'ची खरी भावना आहे, असे उषा यांनी म्हटले आहे.
pt-usha commonwealth-games ग्लासगोमध्ये पदके जिंकण्याच्या बाबतीत भारतीय महिलांनी आघाडी घेतली असून, विविध क्रीडा प्रकारांमध्ये महिलांच्या खेळातील वाढती गुणवत्ता आणि सातत्य पुन्हा एकदा दिसून आले आहे. ऑलिम्पिक विजेती मीराबाई चानू हिने भारोत्तोलनात आणखी एक सुवर्णपदक जिंकले. तसेच, पॅरा-ॲथलेटिक्समध्ये शर्मिला धनकर हिने महिलांच्या गोळाफेक सुवर्णपदक पटकावले, तर अस्मिता डे हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरून इतिहास घडविला.
मुष्टियुद्धात भारताने आपली सर्वात प्रभावी कामगिरी नोंदविली; साक्षी चौधरी, प्रीती पवार, जास्मिन लंबोरिया, प्रिया घांघस आणि अरुंधती चौधरी या सर्वांनी सुवर्णपदक जिंकले.
pt-usha commonwealth-games या आठ विजेत्या खेळाडूंनी एकत्रितपणे ग्लासगोमधील भारताच्या मोहिमेला नवी दिशा दिली आहे. भारतीय महिला आता केवळ अधूनमधून पदक जिंकण्याची आशा बाळगणारे खेळाडू राहिलेल्या नाहीत, तर त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवणारे खेळाडू झाल्या आहेत, हे यातून सिद्ध झाले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करून व तरुण मुलींना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचे ध्येय ठेवण्यासाठी प्रोत्साहित करून नेहमीच त्यांना पाठिंबा दिला आहे.