पावसाचा जोर ओसरला; घाट परिसरासाठी येलो अलर्ट कायम

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
पुणे
pune rain update गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी (ता. १) पुणे शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी रिमझिम सरींनी हजेरी लावली, तर दुपारच्या सुमारास काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, संध्याकाळनंतर पुन्हा हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्याने शहरात दिवसभर ढगाळ आणि आल्हाददायक वातावरण कायम राहिले.
 

pune rain update heavy rainfall reduces but yellow alert issued for ghat areas 
शनिवारी पुणे शहरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. ढगाळ वातावरणामुळे उकाड्याची तीव्रता कमी राहिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी (ता. २) शहरातील कमाल तापमानात किंचित वाढ होऊन ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. किमान तापमान २३ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहणार आहे. शहरात दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात रविवारी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे हवामान विभागाने घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आणि पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहर आणि परिसरात pune rain update शनिवारी झालेल्या पावसाची नोंद पाहता, गिरीवन येथे सर्वाधिक २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर कुरवंडे येथे २६ मिलिमीटर, तळेगाव येथे १० मिलिमीटर, माळीण येथे ९.५ मिलिमीटर, भोर येथे ७ मिलिमीटर, निमगिरी येथे ४.५ मिलिमीटर पाऊस झाला.याशिवाय चिंचवड येथे २.५ मिलिमीटर, पाषाण येथे १.५ मिलिमीटर, शिरूर येथे १ मिलिमीटर, तर दापोडी, हडपसर, हवेली, शिवाजीनगर आणि दुदुळगाव येथे प्रत्येकी ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्याच्या घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाट परिसरातून प्रवास करताना वाहनधारकांनी वेग मर्यादेचे पालन करावे आणि हवामानाची स्थिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे सांगण्यात आले आहे.