पुणे
purandar international airport पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी शेतकऱ्यांना संमतीपत्र सादर करण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली असून, उर्वरित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या कालावधीत संमती नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी १ हजार १२५ हेक्टर म्हणजेच ९२.५ टक्के क्षेत्रासाठी शेतकऱ्यांची संमतीपत्रे प्रशासनाला प्राप्त झाली आहेत. यापैकी ६३० हेक्टर म्हणजेच ५२ टक्के क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण झाले असून, संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वितरणही करण्यात आले आहे.या प्रकल्पासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांना २ हजार ६०० कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे. तसेच, शासनाकडून ३ हजार १५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, उर्वरित भूसंपादन आणि मोबदला वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.
अद्याप काही शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर केलेली नसल्याने त्यांना आणखी एक संधी देण्यात आली आहे. १६ ऑगस्ट ही यासाठी अंतिम मुदत असून, या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली संमती नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामांना वेग मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी सहकार्य करून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीतील अनुभवाचा आदर्श घेत पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) दिले आहेत.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या विमानतळ विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आर्थिक बळ देण्यासाठी हडकोमार्फत ६ हजार कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या कामांना मोठी चालना मिळणार आहे.या बैठकीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो कॉम्प्लेक्स, कार्गो हाताळणी सुविधा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांची कामे कुंभमेळा-२०२७ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती संख्या आणि मालवाहतुकीची गरज लक्षात घेऊन आवश्यक यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.