रक्षाबंधनाच्या दिवशी तुरुंगातून बहिणींना दिलेली दोन रुपयांची भेट

संजय दत्तच्या आयुष्यातील भावूक प्रसंग उलगडला

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
मुंबई
sanjay dutt अभिनेता संजय दत्त आज तिसरी पत्नी मान्यता दत्त आणि जुळ्या मुलांसह आनंदी आयुष्य जगत असला, तरी त्याच्या आयुष्यातील संघर्षमय काळ अनेक चढ-उतारांनी भरलेला आहे. एकीकडे चित्रपटसृष्टीत तो यशाची शिखरे गाठत होता, तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात कठीण प्रसंगांचा सामना करत होता. १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणानंतर त्याचे नाव समोर आल्यानंतर त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण पर्व सुरू झाले. तुरुंगवासाच्या काळात घडलेला रक्षाबंधनाचा एक भावनिक प्रसंग आजही दत्त कुटुंबासाठी अविस्मरणीय असल्याचे समोर आले आहे.
 

sanjay dutt emotional raksha bandhan memory from jail leaves fans moved 
‘मिस्टर अँड मिसेस दत्त – मेमोरीज ऑफ अवर पॅरेंट्स’ या पुस्तकात संजय दत्तची बहीण प्रिया हिने या घटनेचा उल्लेख केला आहे. संजय दत्त तुरुंगात असताना रक्षाबंधनाच्या दिवशी त्याच्या बहिणी प्रिया आणि नम्रता त्याला राखी बांधण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. भावाची अवस्था पाहून दोघींनाही मोठा मानसिक धक्का बसला होता. मात्र, स्वतःच्या मनातील वेदना बहिणींना जाणवू नयेत म्हणून संजय दत्तने त्या वेळी आपले दुःख लपवण्याचा प्रयत्न केला.
राखी बांधल्यानंतर संजय दत्तने दोन्ही बहिणींना जवळ घेत भावूक होत त्यांना एक खास भेट दिली. त्याने त्यांच्या हातात दोन रुपयांचे कूपन ठेवले. ही रक्कम त्याने तुरुंगात मजुरी करून कमावली होती. ते कूपन देताना तो म्हणाला, “माझ्याकडे सध्या तुम्हाला देण्यासाठी हीच एक गोष्ट आहे.” भावाने प्रेमाने दिलेली ती साधी भेट पाहून प्रिया आणि नम्रता दोघींनाही अश्रू अनावर झाले. रक्षाबंधनाचा तो क्षण संजय दत्त आणि त्याच्या बहिणींसाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा ठरला.तुरुंगवासादरम्यान संजय दत्तने विविध कामांमधून उत्पन्नही मिळवले. कारागृहात त्याने स्वतःचा रेडिओ शो चालवला होता. तसेच एक नाट्यसंस्थाही स्थापन केली होती. याशिवाय खुर्च्या आणि कागदी पिशव्या तयार करूनही त्याने पैसे कमावले. विनोदवीर कपिल शर्मा यांच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सहभागी झाल्यानंतर संजय दत्तने तुरुंगातील दिवसांबद्दल अनेक आठवणी सांगितल्या होत्या.१९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचे नाव समोर आल्यानंतर शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित प्रकरणात त्याला अनेक वेळा तुरुंगात जावे लागले. या प्रकरणात त्याने एकूण पाच वर्षांचा तुरुंगवास भोगला. त्यानंतर आयुष्यातील त्या कठीण टप्प्यावर मात करत त्याने पुन्हा चित्रपटसृष्टीत यशस्वी पुनरागमन केले.