राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठे फेरबदल

युवक आघाडीच्या नेतृत्वात नवे चेहरे, शहरी-ग्रामीण विभागणीचा निर्णय

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
मुंबई

sharad pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मुदतवाढ न देता नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
 

sharad pawar makes major changes in ncp sharadchandra pawar party youth wing appointments announced 
पक्षाने युवक संघटनेत शहरी आणि ग्रामीण अशा दोन स्वतंत्र जबाबदाऱ्या निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार युवक प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच युवती आघाडीच्या नेतृत्वातही बदल करण्यात आला असून, शहर युवती प्रदेशाध्यक्षपदी मनाली भिलारे यांची, तर ग्रामीण युवती प्रदेशाध्यक्षपदी अमृता कालदाते यांची निवड करण्यात आली आहे.
शरद पवार यांनी केलेल्या या नियुक्त्यांमधून पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले होते.दिल्लीतील एका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे स्वागत केले होते. या भेटीचे फोटो समोर आले असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या भेटीमुळे शरद पवार गटाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात आले आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील विविध स्तरांवर फेरबदल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनात शरद पवार यांनी स्वतः आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली होती. या आंदोलनाबाबत सुप्रिया सुळे यांनीही आपली भूमिका मांडली होती. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.