तैपेई,
tanvi sharmas record breaking victory भारतीय बॅडमिंटनच्या युवा स्टार तन्वी शर्माने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करत इतिहास घडवला आहे. अवघ्या १७ वर्षे २२२ दिवसांच्या वयात तन्वीने तैपेई ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून, ही स्पर्धा जिंकणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे.
२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू असतानाच तन्वी शर्माने आपल्या शानदार खेळाने देशाचे नाव उंचावले. अंतिम सामन्यात तिचा सामना व्हिएतनामच्या सहाव्या मानांकित थुई लिन गुयेन हिच्याशी झाला. अवघ्या ३६ मिनिटे चाललेल्या या सामन्यात तन्वीने प्रतिस्पर्धी खेळाडूवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. तन्वीने अंतिम सामन्यात पहिला सेट २१-१६ असा जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्येही २१-१६ अशीच आघाडी कायम ठेवत विजेतेपदावर नाव कोरले. या विजयासह ती तैपेई ओपन सुपर ३०० महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी सर्वात तरुण खेळाडू बनली आहे. तिने तैपेईच्या दिग्गज खेळाडू ताई त्झू-यिंगचा विक्रम मोडला आहे. ताई त्झू-यिंगने वयाच्या १८ वर्षे ८५ दिवसांत हे विजेतेपद जिंकले होते.
तन्वी शर्माच्या या कामगिरीने भारतीय बॅडमिंटनमध्ये आणखी एक ऐतिहासिक नोंद झाली आहे. २००८ मध्ये सायना नेहवालनंतर तैपेई ओपन सुपर ३०० स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी तन्वी ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधीही तन्वीने आपल्या प्रतिभेची छाप सोडली आहे. आशियाई सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघाची ती सदस्य होती. तसेच, माजी जागतिक ज्युनियर क्रमांक एक असलेल्या तन्वी शर्माने एकाच जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप हंगामात दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तन्वीने २०२५ च्या यूएस ओपनमध्ये तिची पहिली सुपर ३०० अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्या वेळी तिला विजेतेपद मिळवता आले नव्हते. आता तैपेई ओपन सुपर ३०० जिंकत तिने आपले पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले असून, भारतीय बॅडमिंटनच्या भविष्यातील मोठ्या स्टार म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.