मुंबई,
Test for Team India Without Bumrah श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. बुमराहच्या पुनरागमनासाठी घाई न करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असून, त्याला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.भारताचा संघ ४ ऑगस्ट रोजी श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. मात्र, त्याआधीच बुमराहच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याची संघात निवड केली असली तरी वैद्यकीय पथकाच्या मंजुरीनंतरच त्याच्या खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्टपासून गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याआधी भारतीय संघ श्रीलंका इलेव्हनविरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. हा सामना ७ ऑगस्टपासून कोलंबो येथे सुरू होईल.शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ४ ऑगस्ट रोजी कोलंबोसाठी रवाना होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ च्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे बुमराहसारख्या अनुभवी आणि प्रमुख गोलंदाजाची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरणार आहे. जसप्रीत बुमराह सध्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो बगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन प्रक्रियेत आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे.बुमराहला मैदानावर परत आणण्यासाठी घाई करण्याऐवजी त्याची दुखापत पूर्णपणे बरी होण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, या संदर्भात बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचे वेळापत्रक:
पहिला कसोटी सामना : १५ ते १९ ऑगस्ट — गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
दुसरा कसोटी सामना : २३ ते २७ ऑगस्ट — सिंहलीज स्पोर्ट्स क्लब, कोलंबो