gen-z : आजच्या काळात जेव्हा आपण 'जेन झी' हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो तो तंत्रज्ञानाशी खेळणारा, प्रगत विचारांचा आणि देशाच्या भविष्याची स्वप्ने पाहणारा तरुण वर्ग. या तरुण वर्गाच्या मजबूत खांद्यावर देशाचे भविष्य आहे. अनेकदा असं वाचलं आहे की जेन झीमध्ये व्यसन करण्याचं प्रमाण कमी आहे आणि ही तरुणाई भजन नाईट्समध्येही तल्लीन होत असते. पण याच तरुणाईच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोणी देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ही बाब केवळ दुर्दैवी नाही तर अति भयानक आहे.

झुरळं अंधारात वावरतात, घाणीत वाढतात आणि जेव्हा उजेड पडतो तेव्हा बिळात शिरतात. ही झुरळाची खरी ओळख आहे. द वेनस्डे या चित्रपटात नसिरुद्धीन शहा यांच्या तोंडी आतंकवाद्यांना उद्देशून एक संवाद येतो की जर तुमच्या घरात झुरळं झाली तर तुम्ही काय करता? थोडक्यात झुरळ हे कधी भुषण होऊ शकत नाही. ते कीटक आहेत आणि त्यांवर हिट मारले जाते. पण अभिजित दिपकेने न्यायमूर्तींच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेत झुरळ नावाची चळवळ उभारली. ज्या गोष्टीची शिषारी उयाची त्या गोष्टीचा अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या झुरळवीराने जंतरमंतरवर नीट पेपरफुटीविरुद्ध तथाकथित आंदोलन केलं. या आंदोलनात हिंदू धर्माला शिव्या देण्यात आल्या, पंतप्रधान मोदींना अत्यंत गलिच्छ शिव्या देण्यात आल्या. देशाचे तुकडे करण्याची, भारताचा नेपाळ करण्याची धमकी देण्यात आली. संसद उखडून टाकण्याची धमकी आणि तशी सोय करण्यात आली. दंगली आणि अराजकता घडवण्यात आली. आणि या सर्व गोष्टी करण्यात आल्या त्या जेन झी या गोंडस नावाखाली. दिल्ली पोलिसांनी 'फेशियल रेकग्निशन सिस्टम' (FRS) च्या माध्यमातून जी माहिती समोर आणली आहे, ती वाचून कोणत्याही सुसंस्कृत माणसाच्या अंगावर काटा येईल. या आंदोलनात चक्क २८७३ गुन्हेगार सामील होते. हो, तुम्ही बरोबर वाचलंय! ज्या आंदोलनाला 'विद्यार्थी आंदोलन' किंवा 'युवा शक्तीचा आवाज' म्हटलं जात होतं, त्या गर्दीत हत्या, बलात्कार, दरोडा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार वावरत होते. नक्षलवादासाठी शिक्षा भोगून आलेले नक्षली देखील होते.
पोलिसांच्या आकडेवारीनुसार, यात १०१ खुनी, ६१ बलात्कारी आणि २८४ दरोडेखोर होते. विचार करा, ज्या ठिकाणी तरुण मुलं-मुली आपल्या मागण्यांसाठी जमली आहेत, तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काय करत होते? हे लोक तिथे सहज आले नव्हते, तर त्यांना तिथे आणलं गेलं होतं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे का? आणि का आणलं गेलं होतं यासाठी तल्लख बुद्धीचीही गरज नाही. लहान मुलंही सांगेल की गुन्हेगार हा गुन्हे करण्यात पटाईत असतो. तसेच या आंदोलनात ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, ती ऐकल्यानंतर 'जेन झी' खरोखरच इतकी असंस्कृत आहे का? असा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे. देशाच्या पंतप्रधानांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिव्या देणं, भारताचा नेपाळ होईल अशा धमक्या देणं, सैनिक व पोलिसांची थट्टा करण, त्यांना त्रास देणं, पत्रकारांवर हल्ले करणं, ही कसली जेन झी आहे? हा कोणत्या प्रकारचा लोकशाही अधिकार आहे? ही भाषा जेन झीची नाहीच. ही भाषा त्या लेफ्ट विंगची आहे, ज्यांनी या तरुणांच्या मनात विष कालवण्याचं काम केलं. आमची पिढी देखील एकेकाळी विशीत होती. पण आमच्या पिढीने कधी मोठ्या माणसांसमोर, महिलांसमोर शिव्या दिल्या नाहीत. काही लेफ्टिस्ट थेरड्यांनी या शिव्यांना जेन झीची भाषा म्हटली आहे. मग या थेरड्यांच्या घरात हीच भाषा वापरतात का?
आणि शिव्या हे नॉर्मलाइझ करणार असाल तर उद्या समोरुन शिव्या द्यायला सुरुवात झाली तर काय कराल? एका गालावर माराल तर दुसरा गाल पुढे करण्याइतके सालस इथे कुणी नाही. आता झालंही तेच. ज्या लोकांनी शिव्या दिल्या, धमक्या दिल्या त्यांना सामान्य माणूसच फटके देत आहे. पोलिस या सर्वांना अद्दल घडवत आहे. पोलिसांचा ससेमिरा वाढला आहे, तंत्रज्ञानाने या गुन्हेगारांचे चेहरे उघड केले आहेत, तेव्हा हे शिवराळ तरुण आणि त्यांचे पाठीराखे माफी मागायला लागले आहेत. आमची चूक झाली, आम्ही रागाच्या भरात बोललो अशी कारणं दिली जात आहेत. पण प्रश्न असा आहे की, हे रागाच्या भरात केलेलं कृत्य होतं होतं की कोणीतरी याची ट्रेनिंग दिली होती? स्क्रिप्ट लिहिली गेली होती? दिल्ली पोलीस आता या गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. पण केवळ गुन्हेगारांना पकडून चालणार नाही, तर या गुन्हेगारांना तिथे कोणी पाठवलं? त्यांना रसद कोणी पुरवली? आणि या झुरळांचा मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा शोध घेणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे पेपरफुटीसाठी धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरलं गेलं. नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्याचप्रमाणे आंदोलनादरम्यान ज्या देशविघातक घटना घडल्या त्यासाठी अभिजित दिपके आणि सौरव दास यांना जबाबदार धरायला हवं. आणि या आंदोलनाप्रमाणे या हिंसक गोष्टींचीही त्यांनी जबाबदारी घेऊन त्यांना संवैधानिक पद्धतीने शिक्षा व्हायला हवी. कारण जेन झीला बदनाम करण्यात या दोघाचा मोठा हात आहे.
विचार करा, संस्कारांची होळी करून, शिवराळ भाषेचा वापर करून एका बाजूला सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य जनतेच्या मनात या तरुणांबद्दल तिरस्कार निर्माण केला गेला. बघा, तुमची मुलं कशी वागतात! असा संदेश समाजात पसरवून जेन झीला 'उद्धट' आणि 'देशद्रोही' ठरवण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. हे सगळं मुद्दामून का केलं गेलं? देशात अस्थिरता निर्माण करणे. हाच एकमेव उद्देश. तरी आपल्या पोलिसांनी प्रचंड संयम दाखवला. एका पाकिस्तानी एन्फ्ल्युएन्सरने म्हटलं की भारतीय सरकारने मुलांचे "लाड" पुरवलेत. आमच्याकडे तुम्ही पोलिस व सैनिकांशी मस्ती कराल तर तुम्हाला गोळ्या घातल्या जातील. आणि तरीही लबाड लोक म्हणतात की पोलिसांनी मुलांवर अत्याचार केले. उलट मुलं म्हणून खूप सहन केलं. पण आता या झुरळांना अद्दल घडवावीच लागणार आहे.
वाचकहो, आतापर्यंत आपल्याकडे नेपाळ, बांगलादेश व श्रॊलंकेसारखी जेन झीची क्रांती घडावी अशी उघडौघड विधाने केली जात होती. पण सीजेपीच्या आंदोलनात हे प्रत्यक्ष घडताना आपण पाहिलो. आपला देश कमकुवत नाही म्हणून या झुरळांना पूर्ण संधी नाही मिळाली. पण जेन झीच का? जेव्हा तरुण वर्ग रस्त्यावर उतरतो, तेव्हा तो देशाचा आवाज असतो. पण जेव्हा त्या आवाजात गुन्हेगारांचा आवाज मिसळला जातो आणि त्यात शिवीगाळ येते, तेव्हा तो आवाज बदनाम होतो. या 'झुरळांना' माहित होतं की, जोपर्यंत जेन झीची प्रतिमा जबाबदार नागरिक म्हणून राहील, तोपर्यंत त्यांचा अजेंडा यशस्वी होणार नाही. म्हणून त्यांनी या तरुणांना समोर केलं आणि मागे राहून गुन्हेगारांच्या माध्यमातून, लेफ्ट विंग तरुणांच्या माध्यमातून हिंसा आणि शिवीगाळ घडवून आणली. जेन झीला बदनाम करून त्यांना समाजापासून तोडणं, हा या मागचा मुख्य उद्देश होता. जर तरुण वर्ग बदनाम झाला, तर त्यांच्या मागण्यांकडे कोणीही गांभीर्याने पाहणार नाही. हा एक प्रकारचा 'सायकोलॉजिकल वॉरफेअर' होता, जो या देशातील काही शक्तींनी आपल्याच तरुणांविरुद्ध पुकारला होता. देशातील तरुणाईची ऊर्जा अशा विध्वंसक कामासाठी खर्च होत राहिली तर देशाची प्रगती खुंटेल, अराजकता माजेल आणि पुन्हा देश गुलाम होईल. म्हणूनच आता राष्ट्रभक्त जेन झीने पुढाकार घ्यायला हवा. मुलांनो, या झुरळांना ओळखायला शिका. हे लोक तुम्हाला क्रांतीची स्वप्नं दाखवतील, पण प्रत्यक्षात तुम्हाला गुन्हेगारीच्या चक्रव्यूहात ढकलतील. तुमची बदनामी हीच त्यांची ताकद आहे. त्यामुळे सावध राहा, अभ्यासे प्रकट व्हा आणि आपल्या हक्कासाठी लढताना संस्कारांची आणि कायद्याची चौकट मोडू नका.
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री