टी-२० क्रिकेटमध्ये घडलं अशक्य; ८५ धावांवर प्रतिस्पर्धी गारद

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
गयाना,
Trophy to the Guyana Amazon Warriors ग्लोबल सुपर लीगच्या अंतिम सामन्यात टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात नाट्यमय लढतींपैकी एक पाहायला मिळाली. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने अवघ्या ८५ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे बचाव करत सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा ६ धावांनी पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांना १०० धावांचाही टप्पा गाठता आला नाही, मात्र गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गयाना ॲमेझॉन वॉरियर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. रहमानुल्ला गुरबाज ८, शिमरॉन हेटमायर ४ आणि रोव्हमन पॉवेल २ धावांवर बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. एका टप्प्यावर २९ धावांवर आठ फलंदाज तंबूत परतले होते.
 
 
GAYANA
 
अशा कठीण परिस्थितीत मॅथ्यू फोर्डने २८ धावांची सर्वाधिक खेळी केली. ड्वेन प्रिटोरियस १७ धावांवर नाबाद राहिला, तर कर्णधार इम्रान ताहीरने ११ धावांचे योगदान दिले. या तिघांच्या प्रयत्नांमुळे गयानाला ८५ धावांपर्यंत मजल मारता आली.८६ धावांचे माफक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सची फलंदाजीही गयानाच्या गोलंदाजांसमोर टिकू शकली नाही. नियमित अंतराने विकेट्स पडत राहिल्याने संघावर दडपण वाढत गेले. ऑलिव्हर पीकने ३१ धावांची झुंज दिली, तर पीटर सिडल १३ धावांवर नाबाद राहिला. मात्र, उर्वरित फलंदाज अपयशी ठरल्याने संपूर्ण संघ १८.३ षटकांत ७९ धावांवर गारद झाला.
 
 
गयानाच्या विजयात ड्वेन प्रिटोरियस आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. कर्णधार इम्रान ताहीरनेही २ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघावर सातत्याने दबाव कायम ठेवला. टी-२० क्रिकेटमध्ये अवघ्या ८५ धावांचा यशस्वी बचाव करणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. डकवर्थ-लुईस-स्टर्न (डीएलएस) नियम वगळता टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वीपणे बचाव करण्यात आलेल्या सर्वात कमी धावसंख्यांपैकी हा तिसरा सर्वोत्तम बचाव ठरला. यापूर्वी हिमाचल प्रदेशने ७८ धावा आणि महाराष्ट्राने ८१ धावांचा यशस्वी बचाव केला होता. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सच्या या विजयाने टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजही एकहाती सामना जिंकू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध केले.