कुलगाममध्ये छत्तीसगडच्या दोन कामगारांची निर्घृण हत्या

पाणी मागण्याचा बहाणा करत लतीफ बटने साधला डाव

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
श्रीनगर,
kulgam attack दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडमधून उदरनिर्वाहासाठी आलेल्या दोन मजुरांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यामागे लश्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी लतीफ बट याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हल्ल्यापूर्वी त्याने कामगारांमध्ये मिसळून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर अत्यंत कपटाने गोळीबार करून दोघांचा जीव घेतला.
 
 
kulgam attack
 
 
 
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लतीफ बट काळ्या रंगाची पिशवी घेऊन विटभट्टी परिसरात पोहोचला होता. त्या पिशवीत त्याने असॉल्ट रायफल लपवून ठेवली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तो सुमारे १५ ते २० मिनिटे कामगारांमध्ये बसला, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची नावे विचारली आणि आपण कोणालाही इजा करणार नसल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर तो निघत असल्याचा आव आणत असतानाच त्याने तहान लागल्याचे सांगितले आणि पिण्यासाठी पाणी मागितले. एका कामगाराची पत्नी त्याच्यासाठी पाणी आणण्यासाठी आत गेल्याचा फायदा घेत त्याने अचानक रायफल बाहेर काढली आणि जवळून दोन कामगारांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. गोळीबाराच्या वेळी घटनास्थळी दीड ते दोन वर्षांचे एक लहान मूलही उपस्थित होते. हल्ल्यानंतर लतीफ बट आपल्या एका साथीदारासह घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेने दहशतवाद्यांच्या नव्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.kulgam attack आधी संवाद साधून विश्वास निर्माण करणे आणि त्यानंतर अचानक हल्ला करणे, ही भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी आखलेली रणनीती असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे.
यापूर्वी पहलगाममध्येही दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. कुलगाममधील हल्ल्यातही विश्वासाचा गैरफायदा घेत निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याने अशा घटनांमागे समाजात भीती, फूट आणि तणाव निर्माण करण्याचा सुनियोजित प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठे अभियान राबविण्यात येत आहे.