प्रसिद्ध अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे निधन

वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    दिनांक :02-Aug-2026
Total Views |
अमेरिका
vincent pastore   हॉलिवूडमधील लोकप्रिय मालिका द सोप्रानोस मधील गँगस्टरच्या भूमिकेमुळे जगभरात ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते व्हिन्सेंट पास्टोर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे सह-अभिनेते आणि मित्र मायकल इम्पेरिओली यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली. पास्टोर यांच्या निधनामुळे हॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
 

vincent pastore dies at 80, sopranos actor remembered by hollywood fans 
मायकल इम्पेरिओली यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली. “माझा प्रिय मित्र आणि सहकारी व्हिन्सेंट पास्टोर आता आपल्यात राहिले नाहीत. हा आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी क्षण आहे. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले, अमेरिका, इटली आणि ऑस्ट्रेलियाचा प्रवास केला. त्याच्यासोबत घालवलेले क्षण कायम स्मरणात राहतील. विनी माझ्यासाठी भावासारखा होता. तो अत्यंत दयाळू आणि आपल्या कुटुंबावर व मित्रांवर मनापासून प्रेम करणारा उत्तम व्यक्ती होता. त्यांची उणीव कायम जाणवत राहील,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.व्हिन्सेंट पास्टोर यांच्या निधनाबाबत त्यांचे मॅनेजर बॉब मॅकगोवन यांनी ‘द असोसिएटेड प्रेस’ला माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पास्टोर कोणाच्याही संपर्कात नव्हते. त्यानंतर न्यूयॉर्कमधील सिटी आयलंड येथील त्यांच्या निवासस्थानी ते मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
व्हिन्सेंट पास्टोर यांनी १९८० च्या दशकात अभिनय क्षेत्रात कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९९० च्या दशकात त्यांनी हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, द सोप्रानोस या लोकप्रिय मालिकेतील त्यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेली ठरली.
 
या मालिकेत त्यांनी सुरुवातीला एका गुन्हेगाराची भूमिका साकारली होती. पुढे त्याच व्यक्तिरेखेने एफबीआयचा खबरी बनत कथानकाला नवे वळण दिले. या भूमिकेतील त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे त्यांना प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही मोठी प्रशंसा मिळाली.अभिनेता होण्यापूर्वी व्हिन्सेंट पास्टोर यांनी अमेरिकन नौदलात सेवा बजावली होती. व्हिएतनाम युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पेस युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले आणि अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली.व्हिन्सेंट पास्टोर यांच्या निधनाने हॉलिवूडने एक अनुभवी, दमदार आणि प्रभावी अभिनेता गमावला आहे. त्यांच्या अभिनयातील वैशिष्ट्यपूर्ण शैली आणि संस्मरणीय व्यक्तिरेखा यामुळे ते कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.