मुंबई,
Vitthal Wari journey with Lalpari आषाढी एकादशी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 'लालपरी'ने यंदाही लाखो वारकऱ्यांचा विश्वास जपला. राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने विशेष वाहतूक व्यवस्था उभारली होती. या माध्यमातून सुमारे ५,५०० बसेसच्या साहाय्याने ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास घडवून आणण्यात आला.यात्रेच्या काळात एसटी महामंडळाने एकूण २१ हजार ५२७ विशेष फेऱ्या चालवल्या. या विशेष वाहतुकीतून महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत, लाखो वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी होणे ही एसटी परिवारासाठी विठुरायाची कृपा असल्याचे म्हटले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या प्रत्येक भाविकाला सुरक्षितपणे पंढरपूरपर्यंत पोहोचवणे आणि दर्शनानंतर त्याला सुखरूप घरी परत आणणे ही केवळ वाहतूक सेवा नसून विठ्ठलाची सेवा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.राज्यातील विविध विभागांमधून आलेल्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात्रेदरम्यान अहोरात्र काम करत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली. प्रचंड गर्दी आणि वाहतुकीवरील ताण असूनही भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
सरनाईक यांनी सांगितले की, वारीतील प्रत्येक वारकऱ्याच्या सेवेत एसटी कर्मचाऱ्यांनी समर्पणाची भावना दाखवली आहे. स्वतःचे सण-उत्सव बाजूला ठेवून दिवस-रात्र सेवा देणाऱ्या चालक, वाहक, अधिकारी, यांत्रिक कर्मचारी आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे त्यांनी कौतुक केले.एसटी महामंडळ हे केवळ प्रवासी वाहतूक करणारे संस्थान नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेली लोकसेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले. लाखो भाविकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच एसटीच्या सेवेचे खरे यश असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत 'लालपरी'ची लोकसेवेची परंपरा अधिक सक्षमपणे पुढे नेली जाईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.