नवी दिल्ली,
Amit Shah attack on Congress ‘वंदे मातरम’च्या कडव्यांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने १९३७ मध्ये मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ‘वंदे मातरम’चे विभाजन करून देशाच्या फाळणीचा पाया घातला, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी केला. ‘वंदे मातरम’चे विभाजन करण्याचे परिणाम देशाने एकदा भोगले आहेत आणि अशी चूक पुन्हा होऊ दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.अमित शाह यांनी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या निर्णयावर आक्षेप घेतला. काँग्रेसने आपल्या १९३७ च्या ठरावानुसार ‘वंदे मातरम’ची केवळ दोन कडवी गाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, १९३७ मध्ये काँग्रेसने मुस्लिम तुष्टीकरणासाठी या महान राष्ट्रीय गीताचे दोन भाग केले आणि त्यातून देशाच्या फाळणीला कारणीभूत ठरलेल्या द्विराष्ट्र सिद्धांताला बळ मिळाले. याच प्रक्रियेतून पुढे देशाची फाळणी झाली आणि पाकिस्तानची निर्मिती झाली, असा दावा शाह यांनी केला.
स्वातंत्र्यदिनी काँग्रेस कार्यालयात संपूर्ण ‘वंदे मातरम’चे सादरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सोनिया गांधी नाराज असल्याचे दिसून आल्याची चर्चा झाली. मात्र, काँग्रेस नेत्यांनी नंतर याबाबत स्पष्टीकरण देताना सोनिया गांधी मल्लिकार्जुन खर्गे बराच वेळ उभे राहिल्यामुळे त्यांच्यासाठी खुर्ची मागत असल्याचे सांगितले. या घटनेनंतर चार दिवसांनी काँग्रेसने आपल्या नेत्यांकडून ‘वंदे मातरम’ची केवळ दोन कडवी गाण्यात येतील, असे जाहीर केले.‘वंदे मातरम’ गीताच्या १५०व्या वर्षानिमित्त नरेंद्र मोदी सरकारने १९३७ मधील ऐतिहासिक चूक सुधारल्याचे अमित शाह यांनी म्हटले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या अजरामर कृतीचे संपूर्ण गीत गाऊन राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ संपूर्णपणे गाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. या निर्णयाला कायदेशीर पाठबळही देण्यात आल्याचा दावा शाह यांनी केला.काँग्रेसच्या निर्णयामुळे पक्षाच्या तुष्टीकरणाच्या धोरणाला पुन्हा एकदा दुजोरा मिळाल्याचा आरोप अमित शाह यांनी केला. व्होट बँकेच्या राजकारणासाठी काँग्रेसने बंकिम बाबूंच्या अजरामर कार्याचा अपमान केला असून, ‘वंदे मातरम’चा जयघोष करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो हुतात्म्यांचाही अवमान केला असल्याचे ते म्हणाले. या हुतात्म्यांनी स्वातंत्र्यलढ्यात अनेक वर्षे तुरुंगवास भोगला, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
राहुल गांधींच्या नेतृत्वावरही निशाणा
काँग्रेस आपल्या १९३७ च्या पक्ष ठरावाचे पालन करत असून संसदीय कायदा नाकारत असल्याबद्दल अमित शाह यांनी आश्चर्य व्यक्त केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा देशात तुष्टीकरणाचे राजकारण पुढे नेत असल्याचा आरोप त्यांनी केला.देशातील जनतेने ‘वंदे मातरम’चे दोन तुकडे होऊ देण्याची चूक यापूर्वी केली होती आणि त्याचे गंभीर परिणाम देशाने भोगले आहेत, असे शाह म्हणाले. त्यामुळे काँग्रेसच्या या निर्णयाविरोधात जनतेने एकत्र येऊन आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘या देशात तुष्टीकरणाचे राजकारण यापुढे चालणार नाही’, असा इशारा अमित शाह यांनी दिला. स्वातंत्र्यानंतर ८० वर्षांनी १९३७ मध्ये काँग्रेसने घेतलेला निर्णय नरेंद्र मोदी सरकारने सुधारला असून, आता तो निर्णय देशातील जनता स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले. भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत असून, पक्ष या मुद्द्यावर सार्वजनिक पातळीवर तसेच विधानसभेतही जोरदार विरोध करणार असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले.