नागपूर
ashok saraf महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात आज त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा गौरव करत त्यांच्या अभिनयशैलीचे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाचे कौतुक केले.
अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून सर्वांना मराठी सिनेमाची गोडी लावली आणि मराठी सिनेमाला एक वेगळी उंची तसेच लोकाभिमुखता मिळवून दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अशोक सराफ यांचा अभिनय अत्यंत सहज असून, त्यांच्या अभिनयात कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही. प्रत्येक भूमिका त्यांनी अतिशय सहजतेने साकारली, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
“मराठी माणूस हा वास्तवात जगणारा आहे. त्यामुळे अशोक सराफ यांनी साकारलेल्या नायकामध्ये मराठी माणसाला स्वतःचे अस्तित्व दिसले,” असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक सराफ हे खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनातील सुपरस्टार असल्याचे म्हटले.
हास्यरस आणि तो सादर ashok saraf करण्याची पद्धत काळानुसार बदलत गेली. या बदलाला वेगळे वळण देण्याचे काम अशोक सराफ यांनी केले, असेही फडणवीस म्हणाले. टीव्हीवरील ‘हम पाँच’सारख्या मालिकांमध्ये त्यांनी सहजतेने हास्यरस निर्माण केला. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि तिथेही आपले वेगळेपण सिद्ध केले. नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीचीही सेवा केली. त्यामुळे अशोक सराफ यांच्याकडे केवळ उत्तम कलावंत म्हणून नव्हे, तर उत्तम माणूस म्हणूनही पाहता येते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या नागरी सत्कार सोहळ्याला नागपूरच्या महापौर निता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वाखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार संदीप जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयप्रवासातील अनुभवही सांगितले. “मला संघर्ष फार कमी करावा लागला. मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं,” असे त्यांनी म्हटले. काय करायचं आणि कुठे थांबायचं, हे कळलं पाहिजे. विनोद करताना तो जास्त पसरला नाही पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक भूमिका अवघड असते आणि एखादे पात्र प्रत्यक्षात उतरवणे ही अत्यंत कठीण प्रक्रिया आहे. मात्र, भूमिका चांगल्या पद्धतीने साकारल्यानंतर ती तितकी कठीण वाटत नाही; त्याआधी मात्र ती कठीण असते, असे अशोक सराफ यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, अनेक नाटके आणि प्रयोग केल्यानंतरही आजही प्रयोगाच्या वेळी रंगमंचावर प्रवेश करताना आपण थोडे धास्तावलेले असतो, अशी मनमोकळी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.