नवी दिल्ली,
bcci faces another test महिला आशिया चषक २०२६ ला सुरुवात होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक असून, या स्पर्धेकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार असून, त्यांची प्रत्येकी चार संघांच्या दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले असून, सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने भारतीय महिला संघाची घोषणा केली असून, हरमनप्रीत कौरकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच एका वेगळ्या मुद्द्यामुळे बीसीसीआयसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने अंतिम सामना जिंकून आशिया चषकावर नाव कोरले, तर पुरस्कार वितरणाच्या वेळी ट्रॉफी नेमकी कोणाच्या हस्ते स्वीकारायची, हा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ शकतो.
मोहसिन नक्वी यांच्यामुळे पुन्हा पेच
आशियाई क्रिकेट परिषदेचे विद्यमान प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या हस्ते भारतीय महिला संघ ट्रॉफी स्वीकारणार का, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामागे गेल्या वर्षीच्या आशिया कपमधील घडामोडींची पार्श्वभूमी आहे. २०२५ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाने पुरस्कार वितरण सोहळ्यात मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर नक्वी ट्रॉफी स्वतःसोबत घेऊन गेले होते आणि भारतीय संघाला ती ट्रॉफी अद्याप मिळालेली नाही. नक्वी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख असण्यासोबतच पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत. त्यामुळे आगामी महिला आशिया चषकात त्यांची भूमिका काय असेल, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
भारत-पाकिस्तान सामना ५ सप्टेंबरला
आगामी आशिया चषकात भारतीय महिला संघाचा समावेश 'अ' गटात करण्यात आला आहे. याच गटात पाकिस्तानचा संघही आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पोहोचला आणि त्याने विजेतेपद मिळवले, तर पुरस्कार सोहळ्यातील ट्रॉफी स्वीकारण्याच्या प्रश्नामुळे पुन्हा एकदा परिस्थिती गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने अद्याप याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, मंडळाकडून दोन्ही बाजूंमध्ये या विषयावर औपचारिक चर्चा होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत पुरस्कार सोहळ्याच्या वेळी काय घडते, याची प्रतीक्षा करण्याची भूमिका स्वीकारली जाऊ शकते.
एसीसीच्या दुसऱ्या अधिकाऱ्याच्या हस्ते ट्रॉफी देण्याचा पर्याय
गेल्या वर्षी निर्माण झालेला वाद पुन्हा होऊ नये, यासाठी एक पर्याय पुढे येऊ शकतो. मोहसिन नक्वी यांनी स्वतः ट्रॉफी देण्याऐवजी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अन्य अधिकाऱ्याच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान केली जाऊ शकते. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात कोणताही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
आशिया कपची ट्रॉफी अद्याप एसीसीच्या कार्यालयात
दरम्यान, २०२५ च्या आशिया कपनंतर ट्रॉफीचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. भारतीय पुरुष संघाने मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर नक्वी ती स्वतःसोबत घेऊन गेले होते. सध्या आशिया कपची ट्रॉफी एसीसीच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
नंतर मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघ एसीसीच्या कार्यालयात येऊन त्यांच्याकडून ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो, असे सांगितले होते. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीच्या बैठकीदरम्यान बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी नक्वी यांची भेट घेतली होती. दोन्ही बाजूंमधील कोंडी संपल्याचे सैकिया यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, ट्रॉफी भारतीय संघाला देण्याचा प्रश्न त्यानंतरही कायम राहिला. आता महिला आशिया चषकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात बाजी मारली, तर मैदानावरील कामगिरीसोबतच पुरस्कार सोहळ्यातील घडामोडींकडेही क्रिकेटविश्वाचे लक्ष असणार आहे.