भंडारा,
Dr. Declaration of Uday Samantha मराठी भाषा विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात ‘कवितेचे गाव’ आणि ‘पुस्तकांचे गाव’ विकसित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील कवी ना. रा. शेंडे यांचे गणेशपूर हे गाव ‘पुस्तकांचे गाव’, तर ज्येष्ठ लेखक द. सा. बोरकर यांचे लाखनी हे गाव ‘कविते' चे गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. सोबतच झाडीबोली साहित्य संमेलनासाठी 25 लाखाचे अनुदान देणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांशी मंत्री डॉ. सामंत यांनी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी विविध विषयांवर सामंत यांनी उत्तरे दिली. यावेळी मराठी शाळा सुरू राहाव्यात, मराठी भाषेला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच मराठी साहित्य आणि मराठी भाषा विभाग यांच्यात अधिक प्रभावी संवाद निर्माण व्हावा, याबाबत साहित्यिकांनी विविध सूचना मांडल्याचे सामंत यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून त्यासाठी मराठी भाषा अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.मराठी माध्यमाच्या शाळांचे संवर्धन, झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन आणि जिल्ह्यात नाट्यगृहाची निर्मिती यावर त्यांनी मत मांडले.
मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा या मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या आहेत. या बोलीभाषांमुळे मराठी भाषेच्या शब्दसंपदेत मोठी भर पडली आहे. त्यामुळे विविध बोलीभाषांतील शब्दांचा स्वतंत्र बोलीभाषा शब्दकोश तयार करण्यात येणार आहे.‘चांदा ते बांदा’ या संकल्पनेतून राज्यातील साहित्यिक, लेखक आणि कवींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बोलीभाषा, साहित्य आणि लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा विभागाचे मासिक सुरू करण्याचा मनोदयही मंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी गणेशपूर पुस्तकांचे गाव आणि लाखनी हे कवितेचे गाव घोषित केल्याचे त्यांनी सांगितले. वाचनाची आवड निर्माण होऊन संस्कृती वाढावी म्हणून हा प्रयोग आहे. या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी 30 दालने उभी करून, त्यात प्रती दालन 1 हजार पुस्तके ठेवणार आहे. एका गावात 30 हजार पुस्तके देऊन लोकांनी ती वाचण्यासाठी जावी, अशी अपेक्षा आहे. यातून त्या दालन असलेल्या घराला रोजगार पण मिळेल, असेही डॉ. सामंत म्हणाले.