मुंबई
govinda and sunita ahuja बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा हे दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वैवाहिक नात्याबाबत विविध चर्चा सुरू असताना आता सुनीता आहुजा यांनी गोविंदाविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका कायदेशीररित्या मागे घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या दाम्पत्याच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून, चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
आज सकाळी सुनीता आहुजा मुलगा यशवर्धन याच्यासोबत मुंबईतील फॅमिली कोर्टात पोहोचल्या. त्यानंतर त्यांच्या आणि गोविंदाच्या नात्यात पुन्हा काही बिनसले आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने त्यांच्या कोर्टातील उपस्थितीने या चर्चांना आणखी उधाण आले होते. मात्र, आता सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका अधिकृतपणे मागे घेतल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही काळात गोविंदा आणि सुनीता यांच्यातील मतभेद उघडपणे समोर आले होते. दोघांनीही एकमेकांवर टीका केल्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत चर्चांना सुरुवात झाली होती. गोविंदाने सुनीतावर आपल्याला जबरदस्तीने अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी करून घेतल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, सुनीता यांनी गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडच्या चर्चेवरून संताप व्यक्त केला होता. त्यांनी कथित गर्लफ्रेंड कोमल राणी हिलाही टोला लगावला होता. त्यामुळे हे दाम्पत्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याच्या वृत्ताला स्पष्ट दुजोरा दिला आहे. “त्यांना काय झालं होतं हे मला माहीत नाही, पण आता त्यांनी ही याचिका अधिकृतपणे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यापूर्वी याचिका दाखल केली होती, मात्र त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नव्हती. आता त्यांनी कायदेशीररित्या केस मागे घेतली आहे,” असे सिन्हा यांनी सांगितले.रिपोर्ट्सनुसार, सुनीता आहुजा यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी गोविंदाविरोधात वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेत विश्वासघात, क्रूरता आणि वेगळे राहणे या कारणांचा कथितरित्या उल्लेख करण्यात आला होता. मात्र, आता ही याचिका मागे घेण्यात आली आहे.सुनीता यांनी कायदेशीर प्रक्रिया मागे घेतल्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोघांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे आणि शांततेचे दिवस यावेत, अशी आशाही गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी व्यक्त केली आहे.