गुना
Guna School Shocker मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील आरोन विकासखंडातील एका शासकीय प्राथमिक शाळेत शिक्षणाच्या मंदिराला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. पाचवीत शिकणाऱ्या जवळपास अर्धा डझन विद्यार्थिनींच्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये वर्गातीलच काही खोडकर विद्यार्थ्यांनी लघवी मिसळून ती त्यांना पाजल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या अमानुष कृत्यानंतर पीडित विद्यार्थिनी रडत-बिलखत प्राचार्यांकडे तक्रार घेऊन गेल्या. मात्र, त्याठिकाणीही त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. विद्यार्थिनींची तक्रार ऐकून कारवाई करण्याऐवजी प्राचार्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठत, ‘तोंडाची चव खराब झाली असेल तर दहा रुपयांची चॉकलेट खा,’ असा सल्ला दिल्याचा आरोप आहे.
ही घटना सोमवारी घडली. पीडित विद्यार्थिनी जवळच असलेल्या अंगणवाडीत रांगोळी काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या बॅग आणि पाण्याच्या बाटल्या वर्गातच ठेवल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत एका खोडकर विद्यार्थ्याने विद्यार्थिनीच्या पाण्याच्या बाटलीत लघवी भरल्याचे समोर आले आहे.
अंगणवाडीतून परतल्यानंतर विद्यार्थिनींनी बाटलीतील पाणी प्यायले. मात्र, पाण्याची चव वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने याबाबत प्राचार्यांना माहिती दिली. मात्र, मदत करण्याऐवजी प्राचार्यांनी त्यांना चॉकलेट खाण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते.
घटनेची माहिती पीडित विद्यार्थिनींनी घरी जाऊन आपल्या पालकांना दिल्यानंतर त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. मंगळवारी सकाळी संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत जोरदार गोंधळ घातला. घटनेचा तीव्र निषेध नोंदवत पालकांनी शाळेला टाळे ठोकले. दोषी विद्यार्थ्यांवर तसेच प्रकरण हाताळताना निष्काळजीपणा आणि असंवेदनशील भूमिका घेतल्याचा आरोप असलेल्या प्राचार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
हंगामा वाढताच शाळा परिसरात खळबळ उडाली आणि प्रशासनाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य आणि निर्माण झालेला तणाव लक्षात घेऊन आरोनच्या एसडीएम मंजूषा खत्री यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी तहसीलदार कृष्णकांत चौबे आणि बीईओ यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले.
यानंतर सरपंचासह दोन विद्यार्थिनींना आरोन एसडीएम मंजूषा खत्री यांच्यासमोर आणण्यात आले. एसडीएम यांनी विद्यार्थिनींकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. प्रशासनिक अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह गावात दाखल झाले. त्यांनी पीडित विद्यार्थिनी, त्यांचे पालक तसेच आरोपी विद्यार्थ्यांचे सविस्तर जबाब नोंदवले.घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन एसडीएम मंजूषा खत्री यांनी बीईओ यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पुढील दोन दिवसांत या घटनेबाबत सविस्तर अहवाल साद करण्याचे कडक आदेशही त्यांनी दिले आहेत.