नाशिक
Harihar Fort Tourist Ban नाशिकमधील हरिहर गड आपल्या निसर्गसौंदर्यासोबतच खड्या आणि थरारक पायऱ्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याच्या पायऱ्या सुमारे ८० अंशांच्या तीव्र उतारावर खडकात कोरलेल्या आहेत. पावसाळ्यानंतर गडावरील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा या चित्तथरारक हरिहर गडावर पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्र्यंबक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर संपत देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात हरिहर गडाच्या खड्या पायऱ्या अत्यंत निसरड्या होतात. त्यातच दाट धुके, अचानक बदलणारे हवामान आणि जोरदार पावसामुळे गडावर अपघात होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गडावर प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडावर क्षमतेपेक्षा अधिक पर्यटकांची गर्दी होणे, पर्यटकांचा वनक्षेत्रात हरवण्याचा धोका तसेच तरुणांकडून होणारी हुल्लडबाजी आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्याचे प्रकार यामुळेही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या सर्व बाबींचा विचार करून हरिहर गडावर पुन्हा एकदा पर्यटकांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे.
प्रवेशबंदीच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबक वनपाल, मेटेउभाडे वनरक्षक, संयुक्त वन व्यवस्थापन समिती (हर्षवाडी) तसेच कळमुस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हरिहर गड पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
त्यामुळे पर्यटकांनी या काळात हरिहर गडाकडे जाऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रवेशबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.