‘लाडकी बहीण’ योजनेला मोठा धक्का... लाभार्थ्यांत 92 लाखांची घट

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
मुंबई
Ladki Bahin Yojana ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. योजनेअंतर्गत करण्यात आलेली पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या तब्बल 92 लाखांनी कमी झाल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या सुमारे 2 कोटी 48 लाख होती. आता ही संख्या 1 कोटी 65 लाख 66 हजार 164 इतकी राहिली आहे.
 
 
Ladki Bahin Yojana 92 Lakh Beneficiaries Removed After E-KYC and Verification
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्यात आली होती. योजना सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज केल्याने राज्यभरातून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले.
गेल्या काही महिन्यांपासून सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येत आहे. ई-केवायसी प्रक्रिया तसेच विविध पात्रता निकषांची तपासणी केल्यानंतर अनेक लाभार्थी अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे.उत्पन्नाची निर्धारित मर्यादा, सरकारी नोकरी, इतर शासकीय योजनांचा लाभ, कुटुंबातील सदस्यांची पात्रता तसेच ई-केवायसीशी संबंधित त्रुटी अशा विविध कारणांमुळे काही लाभार्थी अपात्र ठरले असण्याची शक्यता आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंतच सरकारी मदत पोहोचावी आणि शासकीय निधीचा गैरवापर होऊ नये, हा पडताळणी प्रक्रियेमागील सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, तब्बल 92 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याच्या माहितीनंतर योजनेच्या अंमलबजावणीबरोबरच पडताळणी प्रक्रियेवरही राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता आहे. या योजनेवर राज्याच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे.रक्षाबंधन जवळ येत असल्याने ‘लाडकी बहीण’ योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होण्याची शक्यता असल्याचे समजते. मात्र, दोन्ही हप्त्यांची 3 हजार रुपयांची रक्कम एकत्र जमा केली जाणार असल्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असल्याने पुढील हप्ता पात्र ठरलेल्या आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांच्याच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.