मुंबई
Loose Oil Ban दूध भेसळीविरोधात कठोर कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता सर्वसामान्यांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या खाद्यतेल व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाच्या संदर्भात विशेष ‘कम्प्लायन्स ऑर्डर’ जारी केली असून, त्यानुसार महाराष्ट्रात सुट्टे खाद्यतेल (Loose Oil) विकण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने नुकत्याच केलेल्या विविध तपासण्यांमध्ये खाद्यतेल व्यवसायातील अनेक गंभीर त्रुटी आणि नियमभंग निदर्शनास आले. अनेक ठिकाणी वैध परवाना नसतानाही खाद्यतेलाची विक्री आणि प्रक्रिया सुरू असल्याचे आढळून आले. खाद्यतेलात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून, काही नमुन्यांमध्ये आरोग्यास घातक असलेल्या ट्रान्सफॅट्सचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. रोजच्या वापरातील मोहरीच्या तेलातही भेसळ होत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.
याशिवाय तेलाचा मूळ स्रोत आणि त्याची एक्सपायरी डेट लपवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. वापरलेले, गंजलेले तसेच अन्नपदार्थांच्या वापरासाठी अयोग्य असलेल्या डब्यांमध्ये खाद्यतेलाचे पॅकिंग आणि विक्री केली जात असल्याचेही आढळले. अन्नसंपर्कासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या प्लास्टिक पॅकिंगचा वापर तसेच अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टँकर्समधून अयोग्य पद्धतीने खाद्यतेलाची वाहतूक केली जात असल्याचेही तपासणीत समोर आले आहे.
नव्या आदेशानुसार खाद्यतेल व्यवसायाशी संबंधित सर्व आस्थापनांना आठ ते नऊ विविध प्रकारचे परवाने आणि मंजुरी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. तेलबियांपासून तेल काढणारे उत्पादक, त्यावर प्रक्रिया करणारे व्यावसायिक, वाहतूकदार तसेच बाजारात अंतिम विक्री करणारे दुकानदार अशा संपूर्ण पुरवठा साखळीला हे नियम लागू असणार आहेत. सध्या देशातील २१२ आणि महाराष्ट्रातील २४५ प्रमुख परवानाधारक राज्यात सक्रिय असून, या सर्वांना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
या आदेशामुळे किरकोळ विक्रेत्यांवरही Loose Oil Ban मोठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही दुकानदाराने उत्पादकाकडून विना-सील किंवा सीलशी छेडछाड केलेला तेलाचा साठा खरेदी करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारचा माल दुकानात आढळल्यास किंवा त्याची विक्री केल्याचे निष्पन्न झाल्यास केवळ उत्पादकच नव्हे, तर संबंधित किरकोळ विक्रेत्यालाही तितकाच जबाबदार धरले जाणार असून, त्याच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.सुट्टे खाद्यतेल विकल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, खाद्यतेलाच्या उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत अन्नसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.