मुंबई
maharashtra weather alert राज्यात सध्या पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात कायम असतानाच भारतीय हवामान विभागाने आगामी काळासाठी मोठा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असून, बीड, परभणी, अहिल्यानगर आणि नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हरदोई आणि कर्नाल परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आज 20 ऑगस्ट रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने संबंधित भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागातील धरणांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. अक्कलकुवा-वडफळे परिसरातील अनेक धरणांमध्ये अपेक्षित दमदार पाऊस झालेला नसल्याने पुरेसा पाणीसाठा निर्माण झालेला नाही. त्यामुळे भविष्यातील सिंचनाचा प्रश्न कायम असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.नदी-नाल्यांना अद्याप मोठा प्रवाह आलेला नसल्याने धरणे आणि जलसाठे भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची आवश्यकता आहे. सध्या पिकांना विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा आधार मिळत असला, तरी भूजलपातळी वाढवण्यासाठी आणि आगामी काळातील सिंचनाची गरज भागवण्यासाठी पुरेसा पाऊस होणे गरजेचे आहे.
राज्यात काही भागांत पावसाची हजेरी सुरू असली, तरी अनेक भागांमध्ये अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामासोबतच धरणे आणि जलसाठे भरण्याची आशा आता आगामी काही दिवसांतील पावसावर अवलंबून आहे.