मुंबई
maharashtrachi hasya jatra महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली आहेत. सोनी मराठी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या या खास टप्प्यानिमित्त संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येत वर्धापनदिनाचा आनंद साजरा केला.
गेल्या आठ वर्षांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने केवळ विनोदी कार्यक्रम म्हणून नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. विविध व्यक्तिरेखा, भन्नाट स्किट्स, कलाकारांची अफलातून केमिस्ट्री आणि दैनंदिन जीवनातील प्रसंगांना विनोदी शैलीत सादर करण्याची पद्धत यामुळे कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून सातत्याने भरभरून प्रेम मिळत आले आहे.
या आठ वर्षांच्या प्रवासात कार्यक्रमाने अनेक कलाकारांना घराघरात पोहोचवले. कार्यक्रमातील लोकप्रिय पात्रं आणि संवाद प्रेक्षकांच्या रोजच्या बोलण्यातही सहजपणे दिसून येतात. सोशल मीडियावर स्किट्सची होणारी चर्चा, कलाकारांच्या व्यक्तिरेखांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रत्येक नव्या भागाची प्रेक्षकांना असलेली उत्सुकता यावरून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची लोकप्रियता अधोरेखित होते.
कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी यांनी या खास प्रसंगी आठ वर्षांच्या प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या. “महाराष्ट्राची हास्यजत्रेचा आठ वर्षांचा प्रवास आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. या प्रवासात कलाकार, लेखक, तंत्रज्ञ आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने मनापासून योगदान दिलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला आपलंसं केलं. आमच्या पात्रांवर, विनोदावर आणि कलाकारांवर त्यांनी जे प्रेम केलं, तेच आम्हाला सातत्याने नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देत आलं आहे. आठ वर्षांनंतरही प्रेक्षकांना हसवण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची हीच ऊर्जा आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे,” असे त्यांनी सांगितले.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा आठ वर्षांचा हा प्रवास कलाकार, लेखक, तंत्रज्ञ, निर्माते आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीसोबतच प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाचा उत्सव ठरला आहे. वर्धापनदिनानिमित्त सेटवर झालेल्या छोटेखानी सेलिब्रेशनमधून संपूर्ण टीममधील जिव्हाळा आणि कार्यक्रमाविषयीची आपुलकीही पाहायला मिळाली.
आठ वर्षांचा यशस्वी हास्यप्रवास पूर्ण केल्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा त्याच उत्साहाने आणि नव्या जोमाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि साथ अशीच कायम राहावी, हीच वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण टीमची अपेक्षा आहे.