मालाडच्या हॉटेलवर एफडीएचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
मुंबई
fda action अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सविरोधात कठोर कारवाईचे सत्र सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तपासणी आणि छापेमारी केली जात असताना, मुंबईतील मालाड पश्चिम येथील प्रसिद्ध हॉटेल राधाविरोधातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. हॉटेलच्या स्वयंपाकघरात उंदीर, झुरळे आणि उघडी ड्रेनेज लाईन आढळून आल्यानंतर FDAने हॉटेलचा फूड लायसन्स तात्काळ निलंबित केला आहे.
 

mumbai hotel radha licence suspended after rats and cockroaches found in kitchen | fda action 
18 ऑगस्ट 2026 रोजी FDAच्या पथकाने हॉटेल राधाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान स्वयंपाकघरातील अस्वच्छ परिस्थिती समोर आली. पीठ मळण्याच्या मशीनवर थेट झुरळे रेंगाळताना आढळून आली, तर ड्रेनेजमधून एक मोठा उंदीर बाहेर आल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. त्यासोबतच उघडी ड्रेनेज लाईन आढळल्याने अन्नपदार्थांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले.या प्रकाराची गंभीर दखल घेत FDAने FSS Actच्या कलम 32(3) अंतर्गत हॉटेलचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, FDAच्या पुणे विभागाकडूनही अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी विविध आस्थापनांची तपासणी करण्यात आली. पुणे विभागातील एकूण चार आस्थापनांमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आल्याने संबंधितांविरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 1 लाख 14 हजार 598 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार एफआयआर दाखल करण्यात आले असून, चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन आस्थापने सील करण्यात आली असून, 15 हजार रुपये किमतीचे एक वाहनही जप्त करण्यात आले आहे.
याशिवाय, 19 ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाने महाळुंगे येथील एका कंपनीची तपासणी केली. या तपासणीत काही अन्नपदार्थ संशयित निकृष्ट दर्जाचे तसेच चुकीच्या लेबलिंगचे असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान ‘खिचडी मसाला’ या अन्नपदार्थाचा 5,098 किलो साठा आणि इतर पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.अन्न व्यवसायिकांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता तसेच लेबलिंगसंबंधी निर्धारित निकषांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे. राज्यभर सुरू असलेल्या या कारवाईमुळे अन्नपदार्थांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.