पत्नी आणि बहिणीची हत्या करत तरुणाची आत्महत्या

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
लखनौ,
Murder of bank manager in Lucknow उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कौटुंबिक वादाचा अत्यंत भयानक आणि धक्कादायक अंत झाला आहे. गोमती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (२० ऑगस्ट) एका पतीने आपल्या बँक कर्मचारी पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर घरात जाऊन बहिणीचा जीव घेत स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या मिश्रा या बँक कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा पती मानस याच्यासोबत कौटुंबिक वाद सुरू होता आणि हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित होते. गुरुवारी सकाळी ११:२२ च्या सुमारास मानसने दिव्या यांना बँकेबाहेर बोलावून घेतले. काही वेळ त्यांच्यात संभाषण झाले, परंतु वाद वाढल्याने मानसने अचानक बंदूक काढून दिव्या यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या दिव्या यांना तात्काळ लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
 
 
 
Murder of bank manager in Lucknow
 
पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी मानस घटनास्थळावरून थेट हुसडिया येथील आपल्या घरी पळून गेला. तेथे पोहोचताच त्याने घरात असलेली आपली बहीण विभा बाजपेयी हिची देखील गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर मानसने त्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले. एकामागून एक झालेल्या या तीन मृत्यूंमुळे लखनौ शहरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच लखनौ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिव्या मिश्रा यांच्यासह इतर मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कौटुंबिक कलहातूनच हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या घटनेच्या इतर सर्व पैलूंचा कसून तपास केला जात आहे.