नवी दिल्ली
musician ravi dey राजधानी दिल्लीतील कालकाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपुरी एक्स्टेंशन परिसरातून संगीतविश्वाला हादरवणारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनेक वर्षे संगीतनिर्मिती करणारे प्रसिद्ध संगीतकार रवी डे यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या खोलीत तब्बल पाच दिवस सडलेल्या अवस्थेत पडून होता. या काळात त्यांची विचारपूस करण्यासाठी कुणीही न आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, रवी डे यांची मुलं त्यांच्या घरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लाजपत नगर येथे राहत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी डे हे गोविंदपुरी एक्स्टेंशनमधील एका भाड्याच्या घरात एकटे राहत होते. 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरातून असह्य दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घराचे लोखंडी कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर पोलिसांसह शेजाऱ्यांनाही धक्का बसला. घराच्या मुख्य दरवाजाजवळ रवी डे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी परिसर सील केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवला. 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झाले.
यानंतर पोलिसांनी रवी डे यांच्या musician ravi dey मुलांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. मात्र, मुलांनी रात्रीच्या वेळी येण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशीही ते घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळूनही मुलं का आली नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी रवी डे यांच्या मुलांशी संपर्क साधला असता, त्यांचा वडिलांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला.दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी मुलांचे समुपदेशन करून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानंतर कुटुंबीय मृतदेह स्वीकारण्यास तयार झाले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रवी डे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेमुळे ज्येष्ठ व्यक्तींच्या एकटेपणाचा आणि कौटुंबिक नात्यांमधील वाढत्या दुराव्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.