बंदुकीने मिटविल्या हातावरच्या रेषा; 'रॅम्प'ने दिली नवी दिशा

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
दीप्ती राखुंडे
 
नागपूर,
News about costume designer Rutuja Wankhede काही भेटी या निव्वळ योगायोग नसतात, तर त्या आयुष्याला एक नवी दिशा देऊन जातात. हातातल्या बंदुकीची काळवंडलेली सावली मागे टाकत आणि भूतकाळातील भीतीचे पाश तोडत जेव्हा १० पूर्व नक्षली महिलांनी रॅम्पवर पाऊल ठेवले, तेव्हा समोरील प्रत्येक जण भावुक झाला. जगाच्या नजरेपासून नेहमी दूर राहिलेल्या या महिलांच्या मनातील अनामिक भीती घालवून त्यांच्यात आत्मविश्वासाची ठिणगी पेटवणे आणि त्यांच्याच पारंपरिक पेहरावाला फॅशनच्या मंचावर एक आकर्षक 'ग्लॅमरस रूप' देत जगासमोर स्वाभिमानाने उभे करणे, हे मोठे आव्हान नागपूरच्या वेशभूषाकार (कॉस्च्युम डिझायनर) ऋतुजा वानखेडे यांनी लीलया पेलले.
 
 

News about costume designer Rutuja Wankhede 
हा विशेष कार्यक्रम ‘छत्तीसगड राज्य हातमाग विकास मंडळा’द्वारे रायपूर येथे आयोजित करण्यात आला होता. ‘राष्ट्रीय हातमाग दिना’चे औचित्य साधून पारंपरिक कला, हस्तकला आणि विणकरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या पूर्व नक्षली महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुळच्या नागपूरच्या असलेल्या ऋतुजा वानखेडे यांचे वडील शिक्षक असले तरी त्यांच्यातील सुप्त कलागुण ऋतुजा यांना वारशाने मिळाले. गेल्या २५ वर्षांपासून त्या या क्षेत्रात कार्यरत असून, अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये त्यांनी कॉस्च्युम डिझायनर म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. तरुण भारत नागपूर कार्यालयाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलखुलास संवाद साधला.
 
 
 
अचानक आलेली संधी आणि धावपळीचा प्रवास
ऋतुजा यांना जेव्हा रायपूर येथील कार्यक्रमासाठी बोलावणे आले, तेव्हा त्यांची तब्येत अजिबात ठीक नव्हती. मात्र, कामाची संधी सोडायची नव्हती म्हणून त्यांनी तब्येतीची तमा न बाळगता मुंबईहून पुणे, पुण्याहून रायपूर असा तब्बल २२ तासांचा प्रवास केला. ४ तारखेला रायपूरमध्ये पोहोचल्यानंतर ७ तारखेच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे अवघे दोन दिवस उरले होते. या अल्प कालावधीत फेमिना मिस इंडिया २०२६ चे तीन आऊटफिट्स, या १० महिलांचे कपडे आणि इतर मॉडेल्सचे मिळून जवळपास ३० ते ४० आऊटफिट्स तयार करण्याचे प्रचंड आव्हान त्यांच्यासमोर होते.
 
पहिली भेट आणि निरागसतेचा साक्षात्कार
त्या १० महिलांना पहिल्यांदा भेटण्याचा क्षण ऋतुजा यांच्यासाठी थक्क करणारा होता. त्यांच्या भूतकाळाबद्दल ऐकून मनात तयार झालेली प्रतिमा आणि प्रत्यक्षात दिसलेली वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक होता. साडी परिधान करून दिवसभर अनवाणी न राहता हाय बूट घालणाऱ्या या मुलींची जिद्द पाहून ऋतुजा अचंबित झाल्या. त्यांना पाहताना मनात ‘नक्षलवादी’ हा शब्द किंवा कोणताही राग-द्वेष आलाच नाही. उलट, लहान मुलांसारखी निष्पाप निरागसता त्यांच्यात दिसली. कुणी मायेने चार चांगल्या गोष्टी शिकवल्या किंवा सांभाळून घेतले, तर त्या समोरच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात असे ऋतुजा म्हणाल्या.
 
 
पोशाखातील अस्सलता, संघर्ष आणि यश
या कार्यक्रमाबाबत एक अनुभव सांगताना ऋतुजा म्हणाल्या की, ऐनवेळी आयोजकांनी पाश्चिमात्य संकल्पनेऐवजी पारंपरिक थीम ठेवण्याचे निर्देश दिले. दोन दिवसांची मेहनत, हजारो रुपय किंमतीच्या साड्या आणि महिन्याभराचे डिझायनिंग वाया जाण्याचा धोका होता. पण ऋतुजा यांनी धीर सोडला नाही. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून थीमचे नाव बदलले, मात्र वस्त्र (कॉस्च्युम) आणि कोरिओग्राफी तीच ठेवून रात्री अडीच वाजेपर्यंत काम पूर्ण केले. ऋतुजा सांगतात, या महिलांच्या आत्मविश्वासासाठी कम्फर्ट सर्वात महत्त्वाचा होता. त्यामुळे त्यांनी पारंपरिक हातमागाच्या साड्या, दागिने, लाल महूर आणि केसांना चिंध्यांची रिबीन बांधत अस्सल लूक निवडला. विशेष म्हणजे, त्या महिलांनी गेल्या ८-१० दिवसांपासून जे काळे बूट घातले होते, तेच बूट साडीवर कायम ठेवण्यात आले; कारण ते बूट त्यांच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा भाग बनले होते. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मिळालेली शाबासकीची पोचपावती अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद असल्याची भावना ऋतुजा यांनी व्यक्त केली.
 
 

निरोपाचा भावूक क्षण आणि जीवनबदलणारा धडा
केवळ काही दिवसांच्या सहवासात या महिला ऋतुजा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या इतक्या जवळ आल्या की निरोपाच्या वेळी अनेकांना आपल्या भावना आवरता आल्या नाही. तो भावूक क्षण सहन न झाल्याने ऋतुजा यांनाही स्वतःच्या अश्रूंवर नियंत्रण ठेवणे कठीण गेले. मात्र या महिलांसाठी काही तरी करण्याची जिद्द आता त्यांनी मनाशी बांधली आहे. ऋतुजा वानखेडे यांच्या मते, हा रॅम्प वॉक जगासाठी नव्हता तर त्या १० महिलांसाठी स्वतःचा आत्मविश्वास परत मिळवण्याचा एक मार्ग होता. मी फक्त त्यांच्या कपड्यांवर काम केले, पण त्यांच्या जिद्दीने आणि निरागसतेने माझ्या विचारांवर काम केले आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि नागपूरच्या एका कॉस्च्युम डिझायनरसाठी हा अनुभव केवळ फॅशनपुरता मर्यादित न राहता एका नव्या आयुष्याच्या पहाटेचा साक्षीदार होण्याचा सुंदर प्रवास ठरला.