इस्लामाबाद,
Order to shift Imran Khan to hospital पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या शहबाज शरीफ सरकारला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. इम्रान खान यांना तुरुंगातून रुग्णालयात हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारने दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका अखेर मागे घेतली आहे. ही याचिका इस्लामाबादच्या मुख्य आयुक्तांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने या याचिकेतील काही गंभीर तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने ती मागे घेण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी इम्रान खान यांच्या कायदेशीर टीमने अडियाला तुरुंगाला भेट देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या १८ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशाची certified प्रत वरिष्ठ अधीक्षक साजिद बेग यांच्याकडे सुपूर्द केली होती. न्यायालयाच्या आदेशांचे विनाविलंब आणि तात्काळ पालन करण्यात यावे, असा आग्रह इम्रान यांच्या वकिलांनी धरला आहे. या संदर्भात पंजाबचे तुरुंग महानिरीक्षक (आयजी) तसेच रावळपिंडी सदरचे पोलीस अधीक्षक यांनाही पत्राद्वारे आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती शाहिद वाहिद यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इम्रान खान यांच्या प्रकृतीशी संबंधित याचिकेवर सुनावणी घेत त्यांना दिलासा दिला आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना अदियाला तुरुंगातून इस्लामाबाद येथील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. खान यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार व्हावेत, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी शहबाज सरकारने तातडीने पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती, परंतु ती फेटाळली गेली. न्यायालयाने तज्ज्ञ डॉक्टर आणि इम्रान खान यांच्या वैयक्तिक डॉक्टरांचा समावेश असलेले एक विशेष वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले असून त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत रुग्णालयात राहून उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.