मुंबई
prajakta mali मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत आदित्य आणि मेघना यांच्या भूमिका साकारत या जोडीने घराघरात लोकप्रियता मिळवली होती. या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले होते. त्यामुळे तब्बल 13 वर्षांनंतर प्राजक्ता आणि ललित पुन्हा एकत्र येणार असल्याची घोषणा चाहत्यांसाठी खास सरप्राइज ठरली आहे.
प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ असं आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. ‘आणि आम्ही परत एकत्र आलो..’ अशा शब्दांत या जोडीने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. चित्रपटाच्या नावावरूनच त्याची कथा प्रेम, नातेसंबंध आणि लग्नाभोवती फिरणारी असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र या वेळी प्राजक्ता आणि ललित यांच्या गाठी नेमक्या कुठे आणि कशा जुळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर एका खास व्हिडीओद्वारे करण्यात आली. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्येही प्राजक्ता आणि ललित यांची भेट ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्या चित्रपटाची उत्सुकताही निर्माण करण्यात आली आहे.
प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ शेअर करत, ‘आणि आम्ही परत एकत्र आलो.. गेली 13 वर्षे हा महाराष्ट्र आमच्यावर भरभरून प्रेम करतोय. आपली ही रेशीमगाठ अजून घट्ट करायला आणि तुम्हाला परत प्रेमात पाडायला ही जोडी परत येतेय,’ अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. या पोस्टसोबत तिने ‘The OG Jodi is back’ अशी टॅगलाइनही वापरली आहे. त्यामुळे या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पुन्हा पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांचा उत्साह चांगलाच वाढला आहे.
‘शुभ मंगलम जोडी दंगलम’मध्ये यावेळी प्रेक्षकांना साधं लग्न नव्हे, तर थेट ‘डेस्टिनेशन वेडिंग’ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेमकहाणी, लग्नसोहळा आणि त्याभोवतीची धमाल असा मनोरंजनाचा तडका चित्रपटात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील प्राजक्ता आणि ललित यांच्या लोकप्रियतेचा विचार करता, त्यांच्या या पुनरागमनाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
‘शुभ मंगलम जोडी दंगलम’ हा चित्रपट 1 मे 2027 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येणाऱ्या या ‘ओजी जोडी’ला प्रेक्षक किती पसंती देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.