सिंदी (रेल्वे)
Rain मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. पिकांची फळं आणि पाणी गळून पडत असल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण असताना पाऊस मात्र वाकुल्या दाखवत आहे. मागीलवर्षी १० ऑगस्टला ७१० मिमी पर्जन्यवृष्टी झाली होती. यंदा ३६७ मिमी पाऊस पडला आहे. आजघडीला कपाशी आणि सोयाबीन फुलोर्यावर असून पिकांना पावसाची नितांत गरज असून पावसाअभावी पिके कोमेजली आहेत.
यावर्षी खरीप हंगामातील कपाशी आणि सोयाबीन पिकांची लागवड शेतकर्यांनी मृग नक्षत्राच्या शेवटच्या घटकाला केली. कपाशी बियाणे बर्यापैकी उगवले, पण सोयाबीनने दगा दिला. अनेक सोयाबीन उत्पादकांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. शेतकर्यांनी यावर्षी बर्यापैकी उत्पन्न होईल या आशेने पैशांची जुळवा जुळव करून नगदी पीक मानल्या जाणार्या कपाशी आणि सोयाबीनची लागवड केली. पीक उगवताच मशागत करून शेतकर्यांनी निंदण, फवारणी आणि डवरणी केली. मात्र, पावसाने अघोषित सुटी घेतल्याने ऑगस्ट महिना कोरडा जाईल की काय, अशी भिती आता शेतकर्यांना वाटत आहे. अलीकडे कपाशीत भरपूर तण उगवल्यामुळे शेतकर्यांनी तणनाशकांची फवारणी केली. परंतु, तणनाशकांचा पाहिजे तसा परिणाम जाणवत नसल्याच्या तक्रारी आहेत.
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे उत्पादनात घट आली आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून परिसरात पावसाने दडी मारली. मागीलवर्षी, या परिसरात १४२२ मिमी पाऊस पडला होता. सोयाबीनने दगा दिला, पण कपाशीने शेतकर्यांना तारले होते. सध्या पाऊस नसल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत असून सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांच्या झाडांच्या मुळापर्यंत अन्नद्रव्य पोहचत नाही. फुलोरा आणि फळ धरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण पडत असल्यामुळे पाती, फुले आणि बोंड गळून पडत आहे. सध्या सोयाबीन फुलावर असून सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेतच पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.